Nanded News : राज्यात गँगवॉरचा थरार; तिहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ
Nanded News : नांदेडमध्ये टोळीयुद्धातून तिहेरी हत्याकांड घडले आहे. अर्जितसिंग चव्हाणच्या हत्येनंतर त्याच्या भावाने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन आरोपींची चाकूने वार करून हत्या केली.

Nanded News : नांदेड शहरात गँगवॉरमधील वर्चस्वातून तिहेरी हत्याकांडाची घटना शनिवारी पहाटे घडली. यात एकाची निळा रोडलगतच्या कॅनल रोडवरील ई-स्क्वेअर परिसरात हत्या करण्यात आली.
तर ‘खून का बदला खून’ असे म्हणत या मयत तरुणाच्या भावाने हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच चाकूने वार करून हत्या केली. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार नांदेड शहरालगतच्या कॅनल रोडवरील ई-स्क्वेअर परिसरात शुक्रवारी रात्री सय्यद आवेश सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज यांच्यासह इतर अज्ञात आरोपींनी अर्जितसिंग चव्हाण याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या सय्यद अवेज व आणखी एका युवकास पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास मयत अर्जित सिंगच्या भावाने ‘खून का बदला खून’ असे म्हणत रुग्णालयात जाऊन जखमी सय्यद अवेस व मोहम्मद अरबाज या दोघांवर चाकूने हल्ला केला.
यात दोघांचाहा जागीच मृत्यू झाला. सदर घटना गँगवॉरमधून वर्चस्व गाजवण्याच्या वादामधून झाली असल्याची चर्चा होत आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांची संख्या जास्त असल्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पोलीस शोध घेत आहेत. यासाठी घटनास्थळाचा पंचनामा करीत शहरात हल्ले करून पकडण्यासाठी नाकेबंदी करण्यात आली आहे.





