satara | उत्तर कोरेगावमधील अनेक गावांना डेंगीचा विळखा

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – जून महिन्यापासून पडत असलेल्या पावसाचे पाणी साचून त्यात तयार झालेले डास तसेच बदललेल्या वातावरणामुळे उत्तर कोरेगाव मधील काही गावांमध्ये डेंगीचे रुग्ण सापडले असून या आजारातून दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
उत्तर कोरेगाव मधील वाठार स्टेशन देऊर, तळीये, विखळे, बिचकुले, गुजरवाडी, पिंपोडे खुर्द, पिंपोडे बुद्रुक, सोनके, सोळशी या गावामध्ये प्रामुख्याने डेंगूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले असल्याने त्यांच्यावर शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून काही रुग्ण बरे होत आहेत तर काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रुग्णसंख्या वाढत चालल्याने परिसरातील दवाखान्यात या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. डेंगी बाधित रुग्ण सापडल्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार स्टेशन यांच्याकडून प्रत्येक गावात जाऊन सर्वेक्षण करून डेंगी आटोक्यात आणण्यासाठी लोकांना खबरदारी घेण्याचे सूचना दिल्या.
परिसरातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतींना गावातील तुंबलेल्या गटारात साठलेले पाणी काढणे, तसेच गावात औषध फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- एन. ए. निकम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार स्टेशन





