श्रावणात दुष्काळाची दाहकता वाढली

पाऊस पडत नसल्याने ओसाड

डिकसळ- इंदापूर तालुक्‍यात पाऊस पडत नसल्याने दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. जिरायती पट्टयातील शेती आणि वनविभागाचा परिसर ओसाड पडला आहे. दरवर्षी श्रावणात वन विभागाच्या क्षेत्रात हिरवळीचे निसर्गरम्य दृश्‍य पहायला मिळायचे. यंदा मात्र हिच निसर्गसंपदा ओस पडल्याचे दिसत आहे.

इंदापूर तालुक्‍यातील वनगळी, अकोले, पोंधवडी, भादलवाडी, कळस, निमगांव केतकी, व्याहाळी, कडबनवाडी वनक्षेत्रातील झाडे पाण्याअभावी जळून गेल्याने वनक्षेत्राने ओसाड रूप धारण केले आहे. पशू, पक्षी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. त्यामुळे दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. शेती खडकवासला आणि नीरा डाव्या कालव्यावर आधारित असल्याने पानशेत, वरसगाव, खडकवासला ही धरणे फुल्ल भरलेली असून देखील कालव्याला पाणी नाहीत. त्यामुळे मका, बाजरी ही पिके जळून चालल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अकोले येथील जिरायती पट्टयातील शेती निव्वळ कालव्यावर असल्याने पाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने पिके पाण्याअभावी जळाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अजूनही पाऊस पडेल का नाही याबाबात लोकांमध्ये शंका आहे. पाऊस पडला नाही तर वर्ष कसे घालवायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. खडकवासला कालव्याला पाणी सोडून इंदापूर तालुक्‍यातील तलाव भरण्यात यावेत.

यासाठी लोकप्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा करून देखील अजून कालव्याला पाणी येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर्षीचा पावसाळा संपत आल्याने अजून इंदापूर तालुका पावसाअभावी कोरडाच राहिल्याने लोकांना कामधंदा राहिला नाही. शेतात पिके नाहीत. जनावरांना चारा नाही. आर्थिक नियोजन नाही, आदी कारणांमुळे इंदापूर तालुक्‍यातील अर्थकारण कोलमडून गेले आहे. त्यामुळे इंदापूरच्या भाळी पुन्हा दुष्काळाच्या कथा कोरली जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)