किव्ह – रशियाने आज युक्रेनच्या पूर्वेकडील खारकिव्ह शहरावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यामध्ये किमान तिघे ठार झाले आणि २१ जण जखमी झाले आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाकडून जवळपास दररोजच युक्रेनच्या वेगवेगळ्या भूभागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला जातो आहे. गेल्या आठवड्याभरापासून रशियाच्या या हल्ल्यांचे प्रमाण अधिकच वाढले आहे. त्यातच युक्रेनने रशियाच्या ५ हवाई तळांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर आता दोन्ही बाजूंकडून आता युद्धबंदीविषयीच्या चर्चेमध्ये कोणतीही प्रगती होण्याची शक्यताही जवळपास नष्ट झाली आहे. रशियाने खारकिव्ह शहरावर शुक्रवार रात्रभरात जवळपास २१५ ड्रोनचा मारा केला, असे युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे. युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीने जवळपास ८७ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्रे पाडली किंवा हवेतच निकामी केली, असेही युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे. युक्रेनच्या अन्य काही भागांवरही रशियाच्या ड्रोनचा मारा झाला. यामध्ये डोनेस्तक, निप्रोपेट्रोव्हस्क, ओडेसा आणि टेर्नोपिल शहर या प्रदेशांसह अन्य काही भागांचा समावेश होता, असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. रशियाकडून केल्या जाणाऱ्या हत्या आणि विनाशाला थांबवण्यासाठी रशियावर अधिक दबाव आणणे आवश्यक आहे, तसेच युक्रेनला बळकटी देण्यासाठी अधिक पावले उचलणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. युक्रेनच्या दारुगोळ्याची कोठारे, ड्रोन उत्पादन कारखाने आणि शस्त्रास्त्रे दुरुस्ती केंद्रांवर ड्रोन हल्ले करण्यात आल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने आज सांगितले. खारकिव्हमधील हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल रशियाकडून काहीही भाष्य करण्यात आलेले नाही. रशियाच्या सैन्याने राजधानीजवळील देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागात रात्रीतून युक्रेनची ३६ ड्रोन पाडली. मॉस्कोच्या उपनगरात ड्रोनच्या ढिगाऱ्यात दोन नागरिक जखमी झाले, असे स्थानिक गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव्ह यांनी म्हटले आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये १८ अपार्टमेंट इमारती आणि १३ खाजगी घरांचेही नुकसान झाले, असे खारकिव्हचे महापौर इहोर तेरेखोव्ह म्हणाले. रशियाचे आक्रमण सुरू झाल्यापासून खारकिव्ह शहरावर झालेला हा सर्वात शक्तिशाली हल्ला होता, असेही ते म्हणाले. याशिवाय दक्षिणेकडील निप्रोपेट्रोव्हस्क प्रांतात ४५ आणि ८८ वर्षांच्या दोन महिला जखमी झाल्या, असे स्थानिक गव्हर्नर सेर्ही लिसाक यांनी म्हटले आहे.