Pune District : भोर ते निगुडघर मार्गावर चालकांचा जीवघेणा प्रवास
Pune District : परंतू, गेल्या वर्षभरापासून रस्ता रुंदीकरण व अर्धवट केलेल्या मोऱ्यांचे काम रखडले आहे. त्यामुळे खोदकाम केलेल्या मोऱ्यांच्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे.

हिरडस मावळ : भोर-महाड मार्गावरील वेनवडी ते निगुडघर दरम्यान मोऱ्यांची रखडलेली अर्धवट कामे व रस्त्यावर पडलेले मोठाले खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालकांना प्रवास करताना मोठी कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.
भोर-महाड रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असून वेनवडी ते आपटी दरम्यान रस्त्यावरील नवीन मोऱ्या टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. परंतू, गेल्या वर्षभरापासून रस्ता रुंदीकरण व अर्धवट केलेल्या मोऱ्यांचे काम रखडले आहे. त्यामुळे खोदकाम केलेल्या मोऱ्यांच्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे.
मात्र, एकाही मोरीचे काम झाले नसून मोऱ्यांच्या ठिकाणी रस्ता खोदल्याने दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या खड्यांची खोली मोठी असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे खड्यांची खोली समजूत येत नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना कसरत करत या खड्ड्यातून भितीदायक व धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
चारचाकी वाहनांचा खालचा भाग खड्ड्यात लागत असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. प्रशासनाकडून तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.
रस्त्यांची चाळण
आंबेघर पुल ते पिसावरे फाटा दरम्यान सलग खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. नांदगाव हद्दीतही खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक झाला आहे. गेल्यावर्षीही पावसाळ्यात हीच परिस्थिती होती. परंतू वर्षभरात कोणतीही डागडुजी केली नसल्याने यावर्षी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वेनवडी ते निगुडघर दरम्यानच्या कामाला शेतकरी संघटनेचा विरोध असून कंत्राटदारांना काम करु दिले जात नाही. कामगारांना मारहाण व दमदाटीही केली जात आहे. त्यामुळे कंंत्राटदार काम करण्यास तयार नाही. याबाबत भोर पोलीस ठाणे व वरिष्ठांशी वेळोवेळी चर्चा झाली आहे. परंतू, अद्याप तोडगा निघाला नाही. शेतकरी संघटनेकडून होणारा विरोध मावळल्यावर कामास सुरुवात केली जाईल.
-अतुल सुर्वे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग.





