Wagholi : वाघोलीत अनधिकृत ड्रेनेज जोडण्यांवर महापालिकेची कारवाई; शॉ टोयोटा शोरूमला ५० हजारांचा दंड
Wagholi :

Wagholi : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील पावसाळी जलवाहिनीत अनधिकृतरीत्या ड्रेनेजचे पाणी सोडणाऱ्यांविरोधात पुणे महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, शॉ टोयोटा शोरूमवर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महापालिकेच्या निदर्शनास आले होते की, पुणे-अहिल्यानगर रोडलगतच्या पावसाळी लाईनमध्ये बेकायदेशीररीत्या सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे केसनंद रोड तसेच जे. जे. नगर परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत होते. परिणामी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी अनधिकृत ड्रेनेज जोडण्या करून पावसाळी लाईनमध्ये सांडपाणी सोडले जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तपासणीवेळी शॉ टोयोटा शोरूमकडूनही बेकायदेशीररीत्या ड्रेनेजचे पाणी सोडले जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी आरोग्य विभागाने संबंधित शोरूमवर ५० हजार रुपयांचा दंड आकारला.
दरम्यान, आगामी काळात अशा प्रकारे अनधिकृतरीत्या ड्रेनेजचे पाणी पावसाळी लाईनमध्ये सोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईवेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप सातव, आरोग्य विभागाचे मिलिंद खानोडे, हनुमंत साळवी, अशोक शिरसागर, सुरेश उबाळे, दीपक वाघमारे, सागर वाघमारे तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.





