भाजप प्रादेशिक पक्षांना संपवतो का? जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी, हरियाणात जेजेपीची पिछेहाट; सेना- राष्ट्रवादीचे काय होणार?

मुंबई – हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रादेशिक पक्षांची जबरदस्त पिछेहाट झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजपसोबत घरोबा करून नंतर काडीमोड घेणाऱ्या पीडीपीची पिछेहाट झाली. तर हरियाणात जेजेपीपीचा पुरता धुव्वा उडाला आहे. याऊलट या दोन्ही राज्यांत भाजपची दमदार कामगिरी झाली आहे. या निकालामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवतो का? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चिला जात आहे.
जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील नॅशनल कॉन्फरन्सने आघाडी घेतली आहे. भाजपने ३० चा आकडा गाठला. तर हरियाणात भाजपला आपली सत्ता राखण्यात यश आले. या दोन्ही राज्यात भाजपने कधिकाळी आघाडी केलेल्या मित्रपक्षांची पिछेहाट झाली आहे.
भाजपने जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. पण त्यानंतर त्यांनी पीडीपीचा हात सोडला होता. दुसरीकडे, हरियाणात त्यांनी जेजेपीला सोबत घेतले होते. पण विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे भाजप प्रादेशिक पक्षांसोबत युती करून त्यांना संपवत असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय पटलावर रंगली आहे.
जम्मू काश्मीर व हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे. भाजपवर आतापर्यंत अनेकदा आपल्या मित्रपक्षांना संपवण्याचा आरोप झाला.
भाजप स्थानिक प्रादेशिक पक्षांसोबत युती करतो. त्यानंतर त्यांच्या मदतीने हळूहळू आपली पाळेमुळे रोवतो. अखेर आपल्याच मित्रपक्षांना कमकुवत करून सत्ता काबीज करतो, असा आरोप केला जातो. यासाठी शिवसेना व शिरोमणी अकाली दलाचे उदाहरण दिले जाते. त्यात आता पीडीपी व जेजेपी या 2 पक्षांची भर पडली आहे.
शिंदे, दादांच्या पोटात गोळा
पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती व जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांनी भाजपसोबत जाऊन अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यंमत्रीपद भूषवले. महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपद मिळवले. त्यामुळे मुफ्ती व चौटाला यांची घसरगुंडी पाहून या दोघांच्याही पोटात गोळा आला तर त्यात नवल करण्यासारखे काही नाही.





