diwali shopping: दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड
diwali shopping:

मध्यवर्ती भागांत मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबलचक रांगा
diwali shopping: दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने शनिवारच्या सुटीचा योग साधून पुणेकर खरेदीसाठी बाहेर पडल्याने शनिवारी (दि. ३१) बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. येत्या शुक्रवारी (दि. ६) धनत्रयोदशी असून दिवाळीपूर्वीचा शेवटचा शनिवार असल्याने बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ होती. दुपारनंतर गर्दीत आणखी भर पडल्याने मध्यवर्ती बाजारपेठा नागरिकांनी फुलून गेल्या होत्या. याचा परिणाम वाहतुकीवर होऊन अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. कपडे, दिवाळी सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, विद्युत रोषणाई तसेच पूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. विशेषतः कुटुंबांसह खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने दुकाने, रस्त्यांवरही मोठी वर्दळ पाहायला मिळाली.
शनिवारच्या सुटीचा फायदा घेत अनेकांनी दिवाळी खरेदी करण्याला प्राधान्य दिले. वाढत्या गर्दीमुळे मध्यवर्ती पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, नदीपात्रातील रस्ता आणि इतर अनेक रस्ते ओसंडून वाहत होते.
वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला होता. वाढलेल्या वाहतूककोंडीचे व्यवस्थापन करताना वाहतूक पोलीस, वॉर्डन यांचीही बरीच दमछाक झाली. अनेक ठिकाणी नागरिकांनी गाड्या व्यवस्थित पार्क न केल्याने अडचणीत वाढ झाली होती.
रविवारी (दि. १) सुटी असल्याने सर्व कार्यालयांसह महाविद्यालये आणि शाळा बंद असणार आहेत. यामुळे बाजारपेठांमधील गर्दीचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गर्दी आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. नागरिकांनी पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.





