Sinhagad Saffron: सिंहगडावर १०० फुटांचा भगवा ; पालिकेची एक कोटींची तरतूद
Sinhagad Saffron:

Sinhagad Saffron: सिंहगड किल्ल्यावर पुणे महापालिका १०० फूट उंचीचा भव्य भगवा ध्वज उभारणार आहे. यासाठी पालिकेने एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ध्वजस्तंभासह परिसराचे सुशोभीकरण आणि प्रकाशयोजनाही करण्यात येणार आहे.
मात्र, सिंहगड पालिकेच्या हद्दीबाहेर असल्याने खर्चासाठी मुख्य सभेची मान्यता घ्यावी लागणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. सिंहगडाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता भगवा ध्वज उभारल्याने पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रस्तावात नमूद केले आहे.
महापौर मंजुषा नागपुरे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ११ सप्टेंबर रोजी सिंहगडावर पाहणी केली होती. त्यानंतर महामंडळाच्या पर्यटक निवास परिसरात ध्वजस्तंभासाठी जागा निश्चित केली. महामंडळाची परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू होणार आहे.
प्रकल्पांतर्गत १०० फूट उंच ध्वजस्तंभ, त्यासाठी पायाभूत बांधकाम, भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना, प्रकाशयोजना आणि परिसराचे सुशोभीकरण होणार आहे. ध्वजस्तंभाची देखभाल व दुरुस्तीही महापालिका करणार आहे. यापूर्वी २०१४ मध्ये पालिकेने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण केले होते.





