Tree-felling: मागील नऊ वर्षांचे वृक्षतोडीचे ऑडिट करा
Tree-felling:

महापालिकेकडे मनसेची मागणी
Tree-felling: पुणे महापालिका हद्दीत २०१७ पासून आजपर्यंत किती झाडे तोडण्यात आली, किती झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आणि भरपाई म्हणून लावलेल्या किती झाडांचे प्रत्यक्ष अस्तित्व आहे, याचे स्वतंत्र आणि सखोल लेखापरीक्षण करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यासंदर्भात मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले आहे.
महापालिकेच्या परवानगीने झालेली वृक्षतोड, मुळासकट काढलेली झाडे, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीची वर्षनिहाय आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. मंजूर परवानग्यांनुसार प्रत्यक्ष किती झाडे तोडण्यात आली, याची स्थळनिहाय पडताळणी करण्याचीही सूचना करण्यात आली आहे.
विकासकामांसाठी झाडे तोडल्यानंतर नियमानुसार किती नवीन झाडे लावणे बंधनकारक होते, प्रत्यक्ष किती झाडे लावली आणि त्यापैकी किती जिवंत आहेत, याचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
केवळ कागदोपत्री वृक्षलागवड दाखवून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन झाडांची मोजणी आणि त्यांच्या सद्यस्थितीची तपासणी करावी, असे मनसेने म्हटले आहे.
वृक्षलागवड, पुनर्रोपण आणि देखभालीवर झालेला खर्च, संबंधित कंत्राटे, देयके तसेच नियमभंगाबद्दल केलेल्या कारवाईचेही आर्थिक लेखापरीक्षण करावे. यासाठी पर्यावरणतज्ज्ञ, वृक्षतज्ज्ञ आणि लेखापरीक्षण तज्ज्ञांची स्वतंत्र समिती नियुक्त करावी.
लेखापरीक्षणाचा अहवाल, वृक्षलागवडीची ठिकाणे आणि जिवंत झाडांचे प्रमाण महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. पुणेकरांना केवळ किती झाडे लावली याची आकडेवारी नको, तर किती झाडे प्रत्यक्ष जगली याचा हिशेब हवा असल्याची मागणी बाबर यांनी केली आहे.





