Metro Gift: दिवाळीत आयटीयन्सना मेट्रो गिफ्ट
Metro Gift:

– हिंजवडी ते शिवाजीनगर लाइनचे दि. ३ नोव्हेंबरला उद्घाटन
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण
– दि. ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत धावणार
Metro Gift: हिंजवडी ते शिवाजीनगर या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाइन-३ मार्गिकेचे लोकार्पण दि. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे सकाळी १०:३० वाजता हा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. दि. ४ नोव्हेंबरपासून ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले.
आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयातील पत्रकार परिषदेस अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण उपस्िथत होते.
यावेळेत धावणार मेट्रो…
४ नोव्हेंबरपासून मेट्रोची पहिली फेरी सकाळी ६:०० वाजता सुरू होईल. माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री १०:३० वाजता, तर जिल्हा न्यायालय स्थानकावरून माणच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री ११:४० वाजता सुटेल.
गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी, तर इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. जिल्हा न्यायालय (शिवाजीनगर) मेट्रो स्थानकावर लाइन-३ ची जोडणी महामेट्रोच्या लाइन-१ (पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट) आणि लाइन-२ (वनाज ते रामवाडी) यांच्याशी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रो आणि लाइन-३ साठी संयुक्त तिकीट ॲप विकसित करण्यात आले आहे.
मार्गिकेवरील स्थानक…
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेवर १७ स्थानके असतील. यापैकी सात स्थानकांवर एक खुला जीना राहणार आहे. त्यामध्ये स्थानक क्र. १ – माण, २ -माण-एमआयडीसी, ३ – माण-बस डेपो, स्थानक क्र. ४ -हिंजवडी फेज-२ सर्कल-२, ५ – हिंजवडी फेज-२ , ६ – पद्मभूषण चौक, ७ – श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी, ८ -हिंजवडी फेज-१, ९ – वाकड चौक, १० – श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, ११ – मिटकॉन, बालेवाडी),
१२ -आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी १३ आणि १४, १५, १६ क्रमांकाच्या स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असून ते नोव्हेंबर २०२६ अखेर पूर्ण होईल. तर, यासह स्थानक क्र. १७ – औंध, १८ -सकाळनगर आणि १९ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्थानक क्र. २० चे काम सुरू आहे २१ -कृषी महाविद्यालय स्थानक क्र. २२ चे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार असून २३ – जिल्हा व सत्र न्यायालय हे शेवटचे स्थानक असणार आहे.





