Jamkhed News : ‘स्वस्तात घर बांधून देतो’ म्हणत दिव्यांग घरमालकाची फसवणूक; दोन मोबाईल, रोख रक्कम घेऊन ठेकेदार फरार
Jamkhed News : जामखेड शहरात स्वतःला मोठा ठेकेदार असल्याचे भासवत एका अज्ञात भामट्याने दिव्यांग घरमालकासह एका मजुराची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Jamkhed News : जामखेड शहरात स्वतःला ठेकेदार असल्याचे भासवत एका भामट्याने दिव्यांग घरमालकासह एका मजुराची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वस्तात घर बांधून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने विश्वास संपादन केला आणि दोन मोबाईल तसेच रोख रक्कम घेऊन फरार झाला. (Jamkhed News)
मिळालेल्या माहितीनुसार, जुने कोर्ट रोडवरील काशीद हॉस्पिटल परिसरात राहणारे दत्ता जाधव आणि सचिन जाधव यांच्या दोन मजली घराचे बांधकाम सुरू होते. घरासमोर बांधकाम साहित्य पाहून एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. कमी खर्चात दर्जेदार काम करून देण्याचे आश्वासन देत त्याने जाधव कुटुंबाचा विश्वास जिंकला. दोघांमध्ये ३० हजार रुपयांत काम करण्याचे ठरले. (Jamkhed News)
एवढेच नव्हे तर राहण्यासाठी घराखालील रिकामी खोलीही त्याला देण्यात आली. दुसऱ्या दिवशी आरोपीने काही मजुरांना कामासाठी बोलावले. घरमालकाचा नातेवाईक असल्याचा समज झाल्याने मजुरांनी कोणतीही शंका न घेता काम सुरू केले. (Jamkhed News)
काम सुरू असताना आरोपीने एका मजुराकडून फोन करायचा आहे असे सांगत सुमारे १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेतला. त्यानंतर त्याने घरमालक सचिन जाधव यांना एका खात्यावर २ हजार रुपये ऑनलाइन पाठवण्यास सांगितले आणि त्याबदल्यात रोख रक्कम देण्याचे आश्वासन दिले. (Jamkhed News)
यानंतर दिव्यांग असलेल्या सचिन जाधव यांचा विश्वास संपादन करून त्यांचा मोबाईलही शिताफीने स्वतःकडे घेतला. त्यांना बीड कॉर्नर परिसरात घेऊन जाऊन एका मोबाईल दुकानातून २ हजार रुपये रोख घेतले. त्यापैकी २०० रुपये सचिन जाधव यांच्या हातात देत, “मजुरांसाठी खाण्याचे साहित्य घेऊन या,” असे सांगून त्यांना दुकानात पाठवले. त्याच संधीचा फायदा घेत आरोपी दोन्ही मोबाईलसह पसार झाला. (Jamkhed News)
बराच वेळ आरोपी परत न आल्याने संशय आल्यावर सचिन जाधव यांनी दुसऱ्या फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. (Jamkhed News)





