मोठी बातमी..! पक्षप्रवेशाच्या चर्चा अन् वैभव खेडेकरांसह चौघांची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा कडक आदेश

रत्नागिरी : मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून खेडेकर यांच्या भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता.
या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कठोर पाऊल उचलत खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. या निर्णयाने कोकणातील मनसेच्या राजकीय रणनीतीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंचा कडक आदेश
मनसेने वैभव खेडेकर आणि इतर तीन नेत्यांना पक्षातून बडतर्फ करताना पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियम व धोरणांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. मनसेकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट म्हटलं आहे, “पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे, तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे.” खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि दापोलीतील महायुतीच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी तातडीने हा निर्णय घेतला.
महायुतीच्या कार्यक्रमात खेडेकर उपस्थित
वैभव खेडेकर यांच्या भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेशाच्या चर्चांनी गेल्या काही महिन्यांपासून कोकणातील राजकारण ढवळून निघालं होतं. दापोलीतील एका महायुतीच्या कार्यक्रमात खेडेकर व्यासपीठावर उपस्थित होते, आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी त्यांना पक्षात येण्याची जाहीर ऑफर दिली होती.
“आम्ही एका कुटुंबातील माणसं आहोत, पुढे काय करायचं हे वैभव खेडेकरांना माहित आहे,” असं कदम यांनी सूचकपणे म्हटलं होतं. खेडेकर यांनी या चर्चांना दुजोरा दिला नसला, तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी गणेशोत्सवानंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याचं सांगितलं होतं.
निष्ठवंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते
दरम्यान, खेडेकर यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर “निष्ठवंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते” असा खोचक संदेश टाकला, यानंतर पक्षप्रवेशाचा चर्चांना बळ मिळालं. यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आणि काही नेते राज ठाकरेंना चुकीची माहिती देत असल्याचं सांगितलं. तथापि, त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यांच्या या हालचालींचा सुगावा लागताच राज ठाकरेंनी कठोर पाऊल उचलत त्यांची हकालपट्टी केली.
कोण आहेत वैभव खेडेकर?
वैभव खेडेकर हे मनसेचे कोकणातील प्रमुख नेते आणि राज ठाकरे यांचे गेल्या 20 वर्षांपासूनचे विश्वासू सहकारी होते. 2006 मध्ये मनसेची स्थापना झाल्यापासून त्यांनी कोकणात पक्षाच्या संघटनात्मक उभारणीत मोलाचा वाटा उचलला. खेड नगरपरिषद मनसेच्या ताब्यात आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती, आणि ते स्वतः खेडचे नगराध्यक्ष होते.
2014 मध्ये त्यांनी दापोली-खेड-मंडणगड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. युवा वर्गात त्यांची चांगली पकड आहे, आणि त्यांच्या आक्रमक नेतृत्वशैलीमुळे खेड आणि दापोली परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
खेडेकर यांचा शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष होता. तथापि, अलीकडे दापोलीतील एका मंदिराच्या कार्यक्रमात रामदास कदम यांनी “सर्व मतभेद भैरीच्या पायाखाली गाडतो” असं सांगत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
खेडेकर यांच्यावर यापूर्वी 2022 मध्ये नगराध्यक्षपदावरून सहा वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई झाली होती, ज्यामागे कथित भ्रष्टाचार आणि नियमांचं उल्लंघन असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. ही कारवाई तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, ज्यामुळे मनसे-शिवसेना वाद पेटला होता.





