Pune District : मुंबईला जाण्यासाठी नियोजनावर चर्चा; कुंजीरवाडीत मराठा समाजाची बैठक
Pune District : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हवेली परिसरातील मराठा समाजबांधवांनी एकत्रितपणे भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले.

लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री मंगल कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तसेच मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी मनोज जरांगे हे ज्यावेळी सांगतील त्यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मुंबई येथे सहभागी होण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हवेली परिसरातील मराठा समाजबांधवांनी एकत्रितपणे भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानंतर मुंबईकडे जाताना समाजबांधवांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी व्हावे, प्रवासाचे नियोजन करावे तसेच आंदोलनादरम्यान शांतता व कायदा-सुव्यवस्था राखावी, याबाबतही बैठकीत मार्गदर्शन केले.
यावेळी सुनील शिंदे, अविनाश काळे, संदीप डुचे, प्रभाकर धुमाळ, अनिरुद्ध मराठे, सचिन सुंबे, निलेश सुंबे, सोमनाथ धुमाळ, बापूसाहेब घुले, सचिन माथेफोड, चंद्रकांत दुंडे, सुभाष कड, दीपक गोते, दिलीप आंबेकर, शुक्रराज काळे, भाऊसाहेब जाधव, राकेश ओझरकर, परिसरातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कुंजीरवाडी येथील धनश्री लॉन्स येथे राहण्याची व जेवण्याची मुख्य व्यवस्था करण्यात येणार आहे. पुणे- सोलापूर महामार्गावरील अनेक मंगल कार्यालय यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कदमवाकवस्ती येथील पालखी मैदान, शेवाळेवाडीजवळील जी. बी. चौधरी यांची मोकळी जागा, मांजरी येथील बाजार समितीची जागा तसेच अनेक ठिकाणच्या मोकळ्या जागेसाठी त्या त्या जागामालकांनी संमती दर्शविली आहे. त्याप्रमाणे राहण्याची व खाण्याची सोय करण्यात येणार आहे.
पोलिसांकडून आढावा
यावेळी मुंबईला जाणाऱ्या समाजबांधवांची संख्या, वाहन व्यवस्था, प्रवासाचे नियोजन, आवश्यक साहित्य तसेच विविध गावांतील समन्वय यावर चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकजुटीने आणि शांततेच्या मार्गाने आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी पोलीस प्रशासनाने धनश्री कार्यालयात येऊन सर्व माहिती घेऊन नियोजनाबाबत चर्चा केली.
गुरूवारी जरांगेंचा हडपसरला मुक्काम
(दि.१७) सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील हे पुणे सोलापूर महामार्गाने काही निवडक कार्यकर्त्यांबरोबर मुंबईला जाणार असून त्यासाठी हडपसर येथे मुक्काम करणार आहेत. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे मुंबईला येण्यास सांगतील, त्यावेळी जाताना तसेच मुक्कामाच्या ठिकाणी कसलीही गडबड, गोंधळ नको. समाजातील लोकांची राहण्याची व खाण्याची सोय करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली.





