Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याचा विकास एका रात्रीत नाही…; माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निराधार टीकेचे बाण?
Dilip Walse Patil : हा बदल एका दिवसात किंवा एका रात्रीत झालेला नाही. त्यामागे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अनेक वर्षांचे नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अहोरात्र परिश्रम आहेत.

रमेश जाधव
रांजणी : आंबेगावच्या राजकारणात अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडणे स्वाभाविक आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला नेतृत्व करण्याचा अधिकार आहे; मात्र त्या स्वप्नांसोबत आत्मचिंतनही तितकेच आवश्यक आहे. 1990 पूर्वीचा आंबेगाव तालुका आणि आजचा आंबेगाव तालुका यातील फरक समजून घेतला, तर विकासाचा खरा प्रवास लक्षात येईल. त्या काळात पुणे-नाशिक महामार्ग आणि मंचर-घोडेगाव हे दोनच प्रमुख डांबरी रस्ते होते. यात्रेतील गुर्हाळांमध्येच ऊस पाहायला मिळायचा. भोसरी येथून निरगुडसर येथील एकमेव वीज उपकेंद्रावरून संपूर्ण तालुक्याला वीजपुरवठा केला जात होता. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाला की, तो पुन्हा सुरू होण्यासाठी तीन-तीन, चार-चार दिवस वाट पाहावी लागत असे.
आंबेगाव तालुक्याच्या विकासाचा इतिहासही नव्याने राजकारणात आलेल्यांनी समजून घेण्याची गरज आहे. हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरणाचे भूमिपूजन, घोड नदीवरील भराडी येथील पहिल्या बंधार्याचे भूमिपूजन आणि ते काम पूर्णत्वास नेण्यामध्ये माजी आमदार तथा सहकारमहर्षी दत्तात्रेय वळसे पाटील यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्याचप्रमाणे माजी आमदार (स्व) बी. डी. काळे आणि माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले यांनीही तालुक्याच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. त्या काळात राजकीय मतभेद होते, निवडणुका लढवल्या जात होत्या; मात्र वैयक्तिक संबंधांमध्ये कटुता नव्हती. निवडणूक संपल्यानंतर परस्परांविषयी आदर आणि मैत्री कायम ठेवण्याची राजकीय संस्कृती होती. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री क्षेत्र भीमाशंकर ते वडगाव पीर या पायी यात्रेचे. माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले यांच्या यात्रेचे निरगुडसर येथे सहकारमहर्षी (स्व) दत्तात्रेय वळसे पाटील यांनी स्वतः स्वागत केले होते. एवढेच नव्हे, तर सर्व यात्रेकरूंच्या भोजनाची संपूर्ण व्यवस्था त्यांनी केली होती.
घोड नदीवर कळंब येथे एकमेव पूल होता. गंगापूरसह पूर्व भागातील सुमारे 30 ते 35 गावांतील नागरिक, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना घोड व मीना नद्या पार करण्यासाठी होडीचा आधार घ्यावा लागत होता. उन्हाळ्यात तब्बल 49 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत होती. दुष्काळी तालुका अशी आंबेगावची ओळख होती. आज मात्र चित्र पूर्णपणे बदलले आहे. रस्त्यांचे जाळे, पूल, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या योजना, वीज व्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि विविध विकासकामांमुळे तालुक्याने मोठी झेप घेतली आहे. हा बदल एका दिवसात किंवा एका रात्रीत झालेला नाही. त्यामागे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अनेक वर्षांचे नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अहोरात्र परिश्रम आहेत. आज विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्यांनी प्रथम डोळे उघडून वास्तव पाहावे. हाताच्या कंकणाला आरसा कशाला? ही म्हण याच ठिकाणी लागू पडते. त्या काळातील परिस्थितीची कल्पना नसेल, तर आपल्या वडिलांना, आजोबांना किंवा त्या काळाचे साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना जरूर विचारा. गेली 36 वर्षे आंबेगावच्या विकासासाठी रात्रंदिवस कोण झटत राहिले, याचे उत्तर तेच देतील.
दूध भेसळ प्रकरणात प्रशासनाने कोणताही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई केली आहे. आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. आणखी 13 आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. अटक झालेल्यांमध्ये आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्या पुतण्याचाही समावेश आहे. ही बाबच कायद्यापुढे सर्व समान असल्याचे स्पष्ट करते. या संपूर्ण प्रकरणात दिलीप वळसे पाटील यांनी कुठेही हस्तक्षेप केलेला नाही. त्यांनी ठरवले असते तर काही आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या दृष्टीने कठीण नव्हते; मात्र त्यांनी तसे न करता सुरुवातीपासूनच एकच भूमिका घेतली-दूध भेसळ करणारा कोणताही असो, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यामुळे या प्रकरणावरून त्यांच्यावर राजकीय हेतूने आरोप करणार्यांनी वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.
पराग मिल्क फूड्स या कंपनीबाबतही अनेक आरोप करण्यात आले; मात्र, अन्न व औषध प्रशासनाने कंपनीची सखोल तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आलेली नाही. त्यामुळे आरोप आणि सत्य यामधील फरक ओळखणे आवश्यक आहे. देवेंद्र शहा आणि त्यांच्या कुटुंबाचे आंबेगाव तालुक्याच्या सामाजिक व आर्थिक जडणघडणीत मोठे योगदान राहिले आहे. त्यांचे आजोबा (स्व) बाबूलाल शहा यांनी सर्वप्रथम शिमला येथून बटाट्याचे सुधारित वाण मंचर परिसरात आणून येथील शेतीला नवे दालन खुले केले. त्यानंतर मंचर येथील पांजरपोळ ट्रस्टची कोट्यवधी रुपयांची मौल्यवान जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यामध्ये (स्व) प्रकाशशेठ शहा आणि देवेंद्र शहा यांनी घेतलेला पुढाकारही विसरून चालणार नाही. आज हजारो रुग्णांना दर्जेदार शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध होत आहे.
दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रातही पराग मिल्क फूड्सने मोठा बदल घडवून आणला. एक काळ असा होता की, अतिरिक्त दूध संकलनामुळे आठवड्यातून दोन-तीन दिवस ’खाडा पद्धत’ राबवावी लागत होती. अनेक शेतकर्यांना दूध ओतून द्यावे लागत असे किंवा घरात साठवून ठेवण्याची वेळ येत होती. पराग मिल्क फूड्स सुरू झाल्यानंतर दूध संकलनाला स्थैर्य मिळाले आणि हजारो दूध उत्पादक शेतकर्यांना नियमित बाजारपेठ उपलब्ध झाली. या उद्योगामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला. हजारो तरुणांना हक्काचा रोजगार मिळाला. करोना महामारीच्या भीषण काळातही देवेंद्र शहा यांनी सामाजिक बांधिलकी जपत अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारलेल्या कोविड केंद्रांमध्ये हजारो रुग्ण, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्यांसाठी दररोज नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली. संकटकाळात दिलेली ही मदत आजही अनेकांच्या स्मरणात आहे. कोणत्याही व्यक्तीवर किंवा संस्थेवर आरोप करणे सोपे असते; मात्र आरोप करण्यापूर्वी त्यांचे समाजासाठीचे योगदान, त्याग आणि वस्तुस्थिती तपासून पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. राजकारणात मतभेद असू शकतात; पण सत्य, न्याय आणि समाजहित या मूल्यांना दुय्यम स्थान देता कामा नये. जनतेसमोर संपूर्ण चित्र मांडणे हीच लोकशाहीची खरी जबाबदारी आहे.
मंचर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील यांनी, सर्वात प्रथम दूध भेसळ करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही स्तरावरील असली तरी तिच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. त्यामुळे त्यांनी या विषयावर काहीच भाष्य केले नाही, असा प्रचार वस्तुस्थितीला धरून नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मनात वळसे पाटील यांच्याविषयी आदरच
मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनात शिवसेनेचे आंबेगाव तालुक्यातील रमेश येवले यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेचीही तालुक्यात चर्चा सुरू आहे. सार्वजनिक व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर वापरण्यात आलेली भाषा ही सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नसून ती त्यांच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी असल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिलीप वळसे पाटील यांनी अनेक वर्षे मंत्रिमंडळात एकत्र काम करत राज्याच्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये सहभाग घेतला आहे. आजही उपमुख्यमंत्री शिंदे हे वळसे पाटील यांच्या ज्येष्ठतेचा आणि प्रशासकीय अनुभवाचा आदर राखूनच त्यांच्याशी संवाद साधतात. अशा परिस्थितीत काही नव्याने राजकारणात सक्रिय झालेल्या व्यक्तींनी व्यक्तिगत टीकेची पातळी गाठणे हे राजकीय परिपक्वतेचे लक्षण नसल्याची चर्चा सुरू आहे.
पत्रकार परिषदेकडे निष्ठावंताची पाठ:
गेल्या दीड-दोन वर्षांत शिवसेनेत प्रवेश केलेल्या रमेश येवले यांनी आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीस अजून साडेतीन वर्षांचा कालावधी असताना तालुक्यातील राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निरीक्षण अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा आणि नेतृत्व करण्याचा अधिकार असला तरी त्यासाठी विकासकामांच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. लांडेवाडी येथे येवले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, गेली वीस ते पंचवीस वर्षे शिवसेनेत सातत्याने काम करणारे आणि गावागावांत पक्षाची संघटना उभी करणारे अनेक पदाधिकारी या पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे संकेत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहेत.
कोणाचा प्रचार केला?
विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या काळात मतदारांना मनाला वाटेल तिथे मतदान करा अशा स्वरूपाचे संदेश देण्यात आल्याचीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. आदिवासी भागातील कळंब-रांजणी तसेच अवसरी-पिंपळगाव गटात नेमका कोणाचा प्रचार स्वयंघोषित नेत्याकडून करण्यात आला होता, याबाबत आजही अनेक कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न आहे. राजकीय टीका करताना सभ्य भाषा, तथ्यांवर आधारित भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांवर विधायक चर्चा हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे मत तालुक्यातील अनेक जाणकार राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
थोडी कळ काढा
दूध भेसळीसारखा गंभीर विषय हा कायद्याने हाताळण्याचा आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. मात्र, त्याच विषयाच्या आडून केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची बदनामी करण्याचा प्रयत्न जनतेच्या नजरेतून सुटलेला नाही. तथ्यांपेक्षा आरोपांना महत्त्व देऊन निर्माण केलेला राजकीय गदारोळ फार काळ टिकत नसतो. राजकारणात संयम, अभ्यास आणि जनतेबद्दलची बांधिलकी अधिक महत्त्वाची असते. निराधार आरोप करून कोणाची प्रतिमा मलिन करण्यापेक्षा स्वतःच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणे अधिक योग्य ठरेल. आंबेगावची जनता सुजाण आहे. ती सर्व पाहत आहे, सर्व समजून घेत आहे आणि योग्य वेळी योग्य उत्तरही देईल. म्हणूनच एवढेच सांगावेसे वाटते, थोडी कळ काढा. विकासाचा इतिहास समजून घ्या आणि मगच आरोपांची भाषा करा.
वळसे पाटील यांची स्पष्ट भूमिका
आंबेगाव तालुक्यात गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून गाजत असलेल्या दूध भेसळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना जाणीवपूर्वक राजकीय लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी स्पष्ट भूमिका सुरुवातीपासूनच वळसे पाटील यांनी मांडलेली असतानाही त्यांनी मौन बाळगल्याचा प्रचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधातील दोन-तीन जणांकडून जाणीवपूर्वक करण्यात येत आहे.





