भाजप आणि जेडीएसमधील मतभेद चव्हाट्यावर

बंगळुरू – कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटकमधील कथित मुडा घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, त्या मोर्चातून जेडीएसने माघार घेतली. त्यामुळे त्या राज्यात विरोधकांच्या भूमिकेत असणाऱ्या भाजप आणि जेडीएस या मित्रपक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर आले.
कॉंग्रेस सरकारला घेरण्यासाठी ३ ते १० ऑगस्ट या कालावधीत बंगळुरू ते मैसुरू दरम्यान मोर्चा काढण्याचे विरोधकांनी ठरवले. मात्र, मोर्चाबाबत भाजपने विश्वासात न घेतल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि जेडीएसचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी केला. मोर्चाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी भाजपने काही नेत्यांवर सोपवली. त्यामध्ये हासन जिल्ह्यातील एका नेत्याचा समावेश करण्यात आल्याबद्दल कुमारस्वामी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मोर्चाला जेडीएस नैतिक पाठिंबाही देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जेडीएसच्या प्रभावक्षेत्रात हासन जिल्ह्याचा समावेश होतो. मात्र, त्या जिल्ह्यातून मोर्चा मार्गक्रमण करणार असूनही भाजपने आपल्याला झुकते माप न दिल्यामुळे जेडीएस दुखावला असल्याचे समजते. जेडीएसच्या निर्णयामुळे कॉंग्रेसला सरकारला घेरताना विरोधक विखुरल्याचे चित्र समोर आले. मैसुरू शहर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) जमीन वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.





