Dhule Crime News : पिंपळनेर (ता. साक्री) आनंदाचा क्षण शोकांतिका ठरल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे घडली आहे. हळदी समारंभादरम्यान किरकोळ वादातून झालेल्या तुफान हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला असून संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेर येथे गोसावी समाजाचा विवाहसोहळा सुरू होता. हळदीच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेव आणि नवरीकडील पाहुण्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर गंभीर मारहाणीत झाले. नवरदेवाच्या बाजूने आलेल्या काही तरुणांनी नवरीकडील मंडळींवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांची नावे सुरेश सुपडुगिर गोसावी (रा. साक्री), साहील सुरेशगिर गोसावी (रा. साक्री) आणि देवा रवींद्र पवार (रा. साक्री) अशी आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्राथमिक उपचारानंतर धुळे( Dhule )येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असून कठोर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.