प्रभात वृत्तसेवा खालापूर – शिवसेनेचे नेते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुख्य आरोपीसह त्याच्या सर्व साथीदारांना अटक करत कारवाई केली आहे. हत्येनंतर आरोपी मोबाईल बंद करून अंडरग्राउंड झाल्याने तपास मोठ्या आव्हानात्मक टप्प्यावर पोहोचला होता. मात्र रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विशेष पथकांनी अचूक तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. रविवारी (दि. २८) सायंकाळी ४.३० वाजता सर्व आरोपींना खालापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत मंगेश सदाशिव काळोखे शुक्रवारी (दि. २६) सकाळी ६.४५ वाजता आपल्या मुलीला शिशु मंदिर शाळेत सोडून घरी परतत असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून दुचाकी आडवली. त्यानंतर तलवार, कोयता व कुऱ्हाडीने सपासप वार करत त्यांची जागीच हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येमागे नगरपालिकेच्या निवडणुकीतील पराभवाचे वैमनस्य असल्याचे तपासात पुढे आले आहे. मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे रविंद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला देवकर यांच्या विरोधात खोपोली नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मानसी काळोखे यांनी उर्मिला देवकर यांचा पराभव केला होता. या प्रकरणात मुख्य सूत्रधार रविंद्र परशुराम देवकर याच्यासह दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मिला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार अशा एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणातील तपास अजूनही सुरू असून, आणखी धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस महानिरीक्षक प्रविण पडवळ, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, संतोष आवटी, मनोज ठाकरे, उपनिरीक्षक अशोक जगताप, मंगेश बाचकर, मिलिंद खोपडे आदी अधिकारी व त्यांच्या पथकांनी तपास करून ही कारवाई यशस्वी केली आहे.