Kamshet Murder – कामशेत गाव हद्दीत श्री जीवन हॉस्पिटलजवळील पाण्याच्या टाकीजवळ आढळलेल्या अज्ञात मृतदेह प्रकरणाचा कामशेत पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत हत्येचा उलगडा केला. मित्राने आरोपीच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत असल्याच्या संशयावरून तिघांनी मिळून मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच गुन्ह्यानंतर माहिती बाहेर पसरवणाऱ्या सहकाऱ्यावरच इतर आरोपींनी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल मंगेश मारकड यांनी गुन्ह्याची फिर्याद दिली आहे. रविवारी (दि. २९) सकाळी श्री जीवन हॉस्पिटल शेजारील पाण्याच्या टाकीजवळ अंदाजे २५ ते ३० वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. मृताच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्याने हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास वेगाने सुरू करण्यात आला. तपासादरम्यान निखिल उर्फ दाद्या माने (वय २८, रा. इंद्रायणी कॉलनी) व रंजीत वाडेकर (वय ३६, रा. दौंडे कॉलनी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत मयताचे नाव आकाश दत्ता पिंगळे (वय २९, रा. साईगाव, ता. मावळ) असल्याचे समोर आले. तो आरोपींचा मित्र असून, आरोपी निखील मानेच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत असल्याच्या संशयातून निखिल माने, रंजीत वाडेकर आणि रोहिदास चव्हाण (वय ३५, रा. चिखलसे) यांनी मिळून त्याचा खून केल्याची कबुली दिली. गुन्ह्याची माहिती इतरांना देत असल्याचा संशय आल्याने आरोपी निखिल माने आणि रंजीत वाडेकर यांनी रोहिदास चव्हाण याच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. तसेच जखमी रोहिदास चव्हाण याच्या वडिलांकडून स्वतंत्र फिर्याद नोंदविण्याची कार्यवाही सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील करत आहेत.