Manoj Jarange – मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही मुंडे व त्यांच्या कार्यकर्त्यांची मग्रुरी अजूनही संपली नसल्याची संतप्त भावना व्यक्त केली आहे. या लोकांची मग्रुरी अजूनही संपली नाही. एवढा खून होऊनही त्यांच्यात पश्चातापाची कोणतीही भावना नाही. हे आता सरकार व मराठा समाजाच्या लक्षात आले आहे, असे ते म्हणाले. जरांगे पुढे म्हणाले, हे सर्वच जातीधर्माच्या लोकांच्या नजरेतून उतरलेत. यांची मग्रुरी व मस्तीखोर व्यवहारामुळे यांची लंका एक दिवस अशीच बुडणार आहे. हे सर्वजण लयास जाणार आहेत, पाताळात बुडणार आहेत. लोक यांना सोडणार नाहीत. धनंजय मुंडे यांनी आता तरी खेदाने संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली, यामुळे सरकारवर नामुष्की ओढावल्यामुळे मी राजीनामा देत आहे असे म्हणण्याची गरज होती. पण आताही त्यांची तीच मग्रुरीची भाषा आहे. वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे ते म्हणालेत. पदाचा व उपचाराचा काय संबंध आहे? एकप्रकारे बरेच झाले. त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यातील जनतेला हे किती मग्रुर आहेत हे समजले. इथून पुढे मराठे आता यांना घाबरणार नाहीत. आपला हात थोडासा आखडता घेतील, असेही ते म्हणाले.