“देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील आणि शेवटचा घाव…”; राऊतांच्या दाव्याने टेन्शन वाढवलं म्हणाले “कोकाटे…”

Sanjay Raut : काल दिवसभर (१७ डिसेंबर) दोन महत्वाच्या आणि मोठ्या घडामोडी घडल्या. एक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते सध्या बिनखात्याचे मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांच्या सदनिका प्रकरणात त्यांना सुनावण्यात आलेल्या २ वर्षांची शिक्षेची आणि १० हजार रुपयांची दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर राज्याच्या राजकारणात कोकाटेंची विकेट पडली असून, मुंडेंचे मंत्रीमंडळात कमबॅक होणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावरच उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
धनंजय मुंडे यांनी अमित शाहांच्या दिल्लीतील भेटीवर बोलताना तसेच त्यांचे मंत्रीमंडळातील कमबॅक होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना राऊत म्हणाले, अमित शाह हे माणसं तोडण्यात पटाईत आहेत. धनंजय मुंडे हे मंत्री होतील का नाही याविषयी मी सांगू शकत नाही. परंतु, त्यांना परत मंत्रीपदी स्थानापन्न करणं हे देवेंद्र फडणवीस यांना सोपं नाही. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होते अशांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे पाप देवेंद्र फडणवीस करतील, असे मला वाटत नाही, असे भाकित संजय राऊतांनी वर्तवले आहे. तसेच राऊतांनी बोलताना एक मोठा दावाही केला आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय केला दावा?
खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. पैशाच्या बॅगा दाखवत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत, असे असंख्य विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील आणि शेवटचा घाव ते मिंध्यांवरच घालतील, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे.
कोकाटे ही हिट विकेट आहे. त्यांनी….
३० वर्षांपूर्वीचे जुने सदनिका प्रकरण माणिकराव कोकाटे यांच्या अंगलट आले असून, त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. त्यांच्याकडचे क्रीडा खाते आणि अन्य काही खाती काढून घेण्यात आली आहेत. ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्यांची आमदारकीही धोक्यात आली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य करत, कोकाटे ही हिट विकेट आहे. त्यांनी स्वतः खड्ड्यात उडी मारली आहे. ती केस आत्ताची नाही. मात्र, ती योग्य वेळी बाहेर आली आणि ती कसब फडणवीसांमध्ये नक्कीच आहे, असे मोठे विधान केले आहे.





