Kirtan Nadagouda Son Death: ‘KGF’ आणि ‘सलार’च्या को-डायरेक्टरवर दुःखाचा डोंगर, ४ वर्षांच्या मुलाचा लिफ्ट अपघातात मृत्यू

Kirtan Nadagouda Son Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. KGF आणि ‘सलार’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे को-डायरेक्टर व असिस्टंट डायरेक्टर कीर्तन नादगौडा यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. त्यांच्या अवघ्या ४ वर्षांच्या मुलाचा, सोनारश नादगौडा याचा, दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात लिफ्टमध्ये अडकल्यामुळे झाला असून, उपचारांपूर्वीच मुलाचा जीव गेला.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. या दु:खद घटनेवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
पवन कल्याण यांनी व्यक्त केल्या संवेदना
पवन कल्याण यांनी आपल्या संदेशात लिहिलं की, कीर्तन नादगौडा यांच्या मुलाचा अकाली मृत्यू अत्यंत वेदनादायक आहे. चार ते साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत ऐकून मन हादरून गेलं आहे, असं त्यांनी नमूद केलं. तसेच, कीर्तन नादगौडा आणि त्यांची पत्नी समृद्धी पटेल यांच्याप्रती त्यांनी मनापासून संवेदना व्यक्त केल्या आणि ईश्वराने या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना केली.
इंडस्ट्रीत शोककळा
या घटनेनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरही सोनारशच्या आत्म्याला शांती लाभावी आणि कुटुंबाला धैर्य मिळावं, यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.
कीर्तन नादगौडांचा करिअर प्रवास
कीर्तन नादगौडा हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील उदयोन्मुख दिग्दर्शक मानले जातात. त्यांनी दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत KGF चॅप्टर 1 आणि KGF चॅप्टर 2 मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. तसेच ‘सलार’ या मोठ्या चित्रपटाशीही ते जोडले गेले होते. अलीकडेच त्यांनी प्रशांत नील यांच्या आगामी हॉरर चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्याची घोषणा केली होती.
या भीषण अपघाताने केवळ कीर्तन नादगौडा यांचंच नाही, तर संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं मन हेलावून टाकलं आहे. या कठीण प्रसंगी सर्वांच्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.





