Devendra Fadnavis : भाजप स्वबळावर की युतीने लढणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली निवडणुकीची रणनीती

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मित्रपक्षांबरोबर युती करण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की, युतीसाठी प्रथम प्रयत्न करावेत आणि जिथे ते शक्य नसेल तिथेच स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा. त्यानुसार स्थानिक पातळीवर चर्चाही सुरू झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर येथील पदाधिकारी, मंत्री, आमदार, माजी नगरसेवक आणि सदस्यांची बैठक फडणवीस यांनी पुण्यात घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या बैठकीत मागील निवडणुकीतील स्थिती आणि सध्याची परिस्थिती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. युतीच्या संदर्भातील अडचणी समजून घेतल्या आणि संघटनेच्या बळकटीसाठी आवश्यक चर्चा करून पुढील दिशानिर्देश दिले. ही चर्चा अतिशय सकारात्मक आणि उत्साहवर्धक वातावरणात झाली.फडणवीस म्हणाले की, वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आढाव्यात युतीबाबतचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत. जिथे युती शक्य आहे, तिथे ती करण्याचा प्रयत्न करावा आणि जिथे शक्य नाही, तिथे स्वतंत्रपणे लढावे.
मात्र, स्वतंत्रपणे लढताना मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या स्थितीनुसार चर्चा सुरू असून हा निर्णय स्थानिक स्तरावर घेतला जाईल.या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, रवी अनासपुरे, मकरंद देशपांडे, माजी आमदार दिलीप कांबळे यांच्यासह स्थानिक आमदार उपस्थित होते.
ठाकरे यांना रस्त्यावर…
पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत वेळेत न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे,
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरे यांच्या मागणीचे स्वागत करतो. त्यांच्या मागणीमुळे सरकार मदत देणार आहे, हे त्यांना मान्य आहे. विरोधी पक्षांनी याबाबत विचारणा करणे गरजेचेच आहे. मात्र, मदत वेळेत दिली जाईल. उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर उतरायची वेळ आम्ही येऊ देणार नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.




