Devendra Fadnavis : “नरेंद्र मोदी हे 2029 मध्ये पुन्हा पंतप्रधान होतील…”; मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान

Narendra Modi | Devendra Fadnavis – ‘नरेंद्र मोदी हे 2029 मध्ये पुन्हा पंतप्रधान होतील’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील एमएमआरडीए अंतर्गत राज्य सरकारच्या वतीने हातात घेण्यात आलेल्या प्रकल्पांच्या फंडांसाठी आज करार झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
यात 4 लाख 7 हजार कोटी रुपयांचे फंडिंग या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी आज उपलब्ध झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. आयजीएफ मुंबई एनएक्सटी-25 या इंडिया ग्लोबल फोरमने आयोजित केलेल्या प्रमुख वार्षिक शिखर परिषदेत ते बोलत होते.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ही परिषद होत असून या परिषदेत पुढील 25 वर्षांमध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान, शाश्वतता आणि नवोपक्रम यावर लक्ष केंद्रित करून जागतिक परिवर्तनात भारताची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आज, रस्ते, रेल्वे, पिण्याचे पाणी, महामार्ग, किनारी रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यासारख्या एमएमआरडीए प्रकल्पांसाठी 4 लाख 7 हजार कोटींचा गुंतवणूक करार करण्यात आले आहे.
एमएमआर प्रदेशाला 1.5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आम्ही नीती आयोगासोबत तयार केलेल्या रोड मॅपमध्ये गुंतवणूक करण्याचा हा एक ऐतिहासिक करार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आमच्यासाठी नवीन संधी :
फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले की, कालपेक्षा आज चांगला आहे आणि उद्या आजपेक्षा चांगला असेल. मला खरोखरच यावर विश्वास आहे. सध्या आपण अनुभवत असलेल्या जागतिक अडचणी असूनही, आम्ही परिस्थितीचे मूल्यांकन केले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की यामुळे आमच्यासाठी नवीन संधी देखील निर्माण होत आहेत.
या जागतिक आव्हानांना सुरुवात झाल्यानंतरही, आम्ही गुंतवणूकदारांशी संवाद साधत आहोत आणि ते आत्मविश्वासू आणि आशावादी आहेत, असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय बँका निधी देण्यास उत्सुक :
फडणवीस पुढे म्हणाले, अनेक गुंतवणूकदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे आणि दररोज आम्ही जागतिक निधींसोबत सामंजस्य करार करत आहोत. आंतरराष्ट्रीय बँका देखील आमच्या प्रकल्पांना निधी देण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे, सध्या आम्हाला निधीबाबत कोणतीही समस्या येण्याची शक्यता वाटत नाही.





