Radhika Apte : “म्हणून मला ‘तसल्या’ चित्रपटांत काम…”; राधिका आपटेचा आलिया-दीपिकावर गंभीर आरोप, थेट म्हणाली….
‘मी आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोणसारखी नाही की माझ्या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल,’ असं स्पष्टपणे सांगत राधिकाने चित्रपटसृष्टीतील व्यावसायिक वास्तवावर भाष्य केलं आहे.

Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटेच्या एका वक्तव्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील महिला कलाकारांच्या संघर्षावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. ‘मी आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोणसारखी नाही की माझ्या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल,’ असं स्पष्टपणे सांगत राधिकाने चित्रपटसृष्टीतील व्यावसायिक वास्तवावर भाष्य केलं आहे.
महिला-केंद्रित चित्रपटांना थिएटरमध्ये अपेक्षित सुरुवात मिळवणं कठीण जातं, असं तिचं म्हणणं आहे. सध्या ‘अक्का’ या आगामी सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या राधिकाच्या या वक्तव्यामुळे मनोरंजनविश्वात चर्चेला उधाण आलं आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने सांगितलं की, चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतो की ओटीटीवर, यापेक्षा तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं तिच्यासाठी महत्त्वाचं आहे.
एखादा चित्रपट चांगला असूनही त्याला बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात मिळेलच, याची खात्री नसते. त्यामुळे पुरुष कलाकार प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटांचाही विचार करावा लागतो, असं तिने स्पष्ट केलं.
राधिका नेमकं काय म्हणाली?
“बॉक्स ऑफिस डोळ्यासमोर ठेवूनच अभिनेत्रींना पुरुष नायकांसोबत चित्रपटांमध्ये काम करावे लागते. गेल्या काही वर्षांपासून, फक्त थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट पाहून कोणते चित्रपट चालत आहेत आणि कोणते नाहीत, हे ओळखणे कठीण झाले आहे.
जर मी एखाद्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली, तर तो चित्रपट कितीही चांगला असला तरी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेलच असे नाही. मी आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोणसारखी थोडी आहे, ज्यांच्या चित्रपटांकडून किमान चांगल्या ओपनिंगची अपेक्षा केली जाऊ शकते. म्हणूनच मला पुरुष नायक असलेल्या चित्रपटांमध्ये काम करावे लागते.”
‘अक्का’मधून प्रेक्षकांच्या भेटीला
राधिका आपटे आणि कीर्ती सुरेश यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘अक्का’ ही १९८० च्या दशकातील पार्श्वभूमीवर आधारित गँगस्टर ड्रामा सीरिज आहे. ही सीरिज ३० ऑक्टोबर २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आता राधिकाच्या या वक्तव्याप्रमाणेच तिच्या आगामी सीरिजला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






