Samruddhi Highway accident : समृद्धी महार्मागावर खाजगी बसचा भीषण अपघात! दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत; 25 जण जखमी
Samruddhi Highway accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे.

Samruddhi Highway accident : समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबायचे काही नाव घेत नाहीये. आता बुलढाणा जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. महामार्गावर एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 जण जखमी झाले असून, एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाला आहे.
या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यासह इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे खासगी बस चालक आणि क्लिनरच्या रिल्स बनवण्याच्या वेडापायी हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त खाजगी बस दुसऱ्या एका कारवर आदळल्याने कारचे मोठं नुकसान झाले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुसदकडे जाणारी एका खाजगी प्रवासी बसचा समृद्धी महामार्गावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. चालक आणि वाहक हे मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात हा अपघात घडल्याचे खाजगी बसमधील प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.
मेहकर टोल नाक्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली. या घटनेनंत जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्या ठिकाणी एक तास डॉक्टर उपचारासाठी न आल्याने जखमींच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने या अपघातात एका दीड वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने उपचारासाठी मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा बेजबाबदार चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.





