मुंबई : संतोष देशमुख यांच्या हत्येची छायाचित्र आणि व्हिडिओ पोलिसांसह सरकारकडे असताना त्यांनी धनंजय मुंडेंच्या बचावाची भूमिका घेतली. सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. सपकाळ पुढे म्हणाले की, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला म्हणून सरकार आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. संतोष देशमुख हत्या प्रकरण सरकारला दाबायचे होते. या टोळीला सरकारचा पाठिंबा होता असे दिसून येत आहे. या अमानवी कृत्यांचे सगळे फोटो, व्हिडिओ, पुरावे सुरुवातीपासून पोलिसांकडे होते म्हणजेच गृहमंत्री व सरकारकडे होते. या सैतानांच्या टोळीची अमानवी कृत्यांची संपूर्ण माहिती असूनही दोन महिने सरकार धनजंय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. कातडी बचाव प्रयोग यशस्वी होणार नाही सपकाळ म्हणाले की, आता आपली कातडी वाचविण्यासाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती अशा बातम्या पसरवून अंग झटकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून सुरु आहे. हा त्यांचा कातडी बचाव प्रयोग यशस्वी होणार नाही, त्यांचे सत्य जनतेसमोर आले आहे. देशमुख कुटुंबियांच्या लढ्याला जनता आणि माध्यमांनी दिलेली साथ यामुळे या प्रकरणातील सत्य उजेडात आले. अन्यथा हे प्रकरण दडपण्यात सरकार यशस्वी झाले असते.