nagar | बसस्थानक इमारती पाडण्याचे काम सुरू

राहुरी, (प्रतिनिधी): माजी खासदार प्रसाद तनपुरे व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राहुरी बस स्थानकाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. ५० वर्षांपूर्वीची बसस्थानक इमारती पाडण्याचे काम आज सुरू झाले. बसस्थानकाच्या नूतनीकरणच्या कामास आज सुरुवात झाली.
नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी बसस्थानक असून गेल्या अनेक वर्षांपासून या बसस्थानकाची अतिशय दुरावस्था झाली होती. बसस्थानकात प्रवाशांना कोणतीही सोयी सुविधा नव्हत्या. पन्नास वर्षांपूर्वीचे जुने बांधकाम असल्याने बसस्थानक इमारत मोडकळीस आली होती. त्यामुळे प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राहुरी बसस्थानक होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत बसस्थानकाचा प्रश्न मांडला. माजी खासदार प्रसाद तनपुरे व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला आज प्रत्यक्षात यश आले.
६ जुलै रोजी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत पावणे चार कोटी रुपये खर्चाच्या नूतन इमारतीच्या कामाला सुरुवात झाली. जुन्या व मोडकळीस आलेल्या बसस्थानकाची इमारत पाडण्यास सुरूवात झाली आहे
सध्या बसस्थानकात पाच प्लॅटफॉर्म असणारे तात्पुरते पत्र्याचे शेड बांधण्यात आले असून, पुढील सहा महिन्यांमध्ये बसस्थानकाची भव्य इमारत उभी राहणे अपेक्षित आहे.
नवीन बस स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मसह कंट्रोल कॅबिन, परिवहन विभागाच्या चालक वाहकांसाठी विश्रामगृह, सौरऊर्जेवरील व्यवस्था अन्य सुविधा उपलब्ध असतील. पूर्वी १७ कोटी रुपये खर्चाच्या नूतन बसस्थानक इमारतीसह व्यापारी संकुल, सुलभ शौचालय विश्रामगृह असे अद्ययावत इमारतीचा आराखडा तनपुरे यांच्या पुढाकाराने करण्यात आला होता.





