Maharashtra Politics : विलीनीकरणाची दिल्लीत खलबतं! काँग्रेसचे दोन बडे नेते राजधानीत; शरद पवार गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याविषयी दिल्लीत खलबंत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याविषयी दोन्ही बाजूच्या बड्या नेत्यांनी दावे प्रतिदावे केले होते. काही काळ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला होता, पण त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेच्या विलिनीकरणाचा मुद्दा मागे पडला असून आता शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्य़ाची चर्चा जोर धरू लागली आहे.
यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याविषयी दिल्लीत खलबंत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीला बोलावलं होतं, त्यानंतर आता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील दिल्लीला बोलवण्यात आलं आहे. हायकमांडच्या आदेशाचे पालन करत नाना पटोले दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी सूचक प्रतिक्रिया देत मोठा राजकीय बॅाम्ब फोडला. विलिनीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यापूर्वीच देण्यात आला होता, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Politics)
या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करत सुरू असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना शिंदे म्हणाले, “काँग्रेसकडूनही विलिनीकरणासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जर अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव असता, तर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून आम्हाला त्याबाबत कल्पना दिली असती.”
दरम्यान, सोमवारी सकाळी शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतही काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर चर्चा झालेली नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. “या विषयासंदर्भात माझ्यापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे विलिनीकरणाबाबत प्रसारित होत असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नाना पटोले यांची सूचक प्रतिक्रिया (Maharashtra Politics )
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिला होता. मात्र, काही कारणास्तव त्यावर निर्णय घेण्यास उशीर झाला. आता देशातील राजकारणात जे काही चाललं आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चालली आहे. अशावेळी सेक्युलर मतांचं विभाजन थांबवण्यासठी, देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवायला, जे काही सेक्युलर विचारांचे पक्ष आहे, त्यांनी एकत्रित यावे, अशी प्रक्रिया सुरु झाली आहे.” अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना दिली.






