Top 10 News : भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब ते राज्यात मुसळधार पावसाचा इशारा..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब ते राज्यात मुसळधार पावसाचा इशारा..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : 1) पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भात ऑरेंज, कोकण-घाटमाथ्यावर यलो अलर्ट
राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार असून मुंबई वेधशाळेने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज, तर कोकण आणि घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 29 जुलै रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, तर 30 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात 28 ते 31 जुलैदरम्यान यलो अलर्ट कायम राहणार आहे. हवामान विभागाने नागरिक, शेतकरी आणि पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी तसेच घाटमाथा व नदीकाठच्या भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केलेय. (Top 10 News)
2) विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय! School बसमध्ये CCTV, GPS आणि पॅनिक बटण सक्तीचे
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र सरकारने शालेय बस नियमांमध्ये मोठे बदल केलेत. नवीन नियमांनुसार पुढील तीन महिन्यांत सर्व शालेय बस आणि व्हॅनमध्ये CCTV कॅमेरे, व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग (GPS), पॅनिक बटण, फायर डिटेक्शन व अलार्म सिस्टिम बसवणे बंधनकारक असेल. तसेच किमान 30 दिवसांचे CCTV फुटेज जतन करावे लागणार आहे. पालकांना वाहनाचे थेट लोकेशन, विद्यार्थ्यांची डिजिटल उपस्थिती आणि प्रवासासंदर्भातील अलर्ट देणारे मोबाईल अॅपही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक सीटला सीटबेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यातील इतर भागांत शालेय बस व व्हॅनची वयोमर्यादा 15 वर्षांवरून 20 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली असून नवीन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत. (Top 10 News)
03) तुकाराम मुंढेंना हायकोर्टाचा पुन्हा दणका! 8 दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती
दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा धक्का दिलाय. नियमानुसार डेअरी चालकांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 14 दिवसांची मुदत न देता थेट परवाने निलंबित केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने 8 दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिलीय. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि अहिल्यानगरमधील डेअरींना दिलासा मिळालाय. न्यायालयात डेअरी चालकांनी बहुतांश त्रुटी दुरुस्त केल्याचा दावा केला. या कारवाईमुळे प्रभावित झालेल्या हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. (Top 10 News)
04) भरदिवसा श्रीरामपूरात थरार! चालत्या कारच्या बोनेटवर सासू; जावयाने सुसाट कार पळवली
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भरदिवसा चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला. न्यायालयातील कामकाज आटोपल्यानंतर कौटुंबिक वादातून एका जावयाने कार वेगात पळवली, तर संतप्त सासू थेट चालत्या कारच्या बोनेटवर लटकली. बोनेटवर महिला असतानाही चालकाने कार थांबवली नाही. दरम्यान, दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या महिलेच्या भावाने सय्यदबाबा चौकात कारची काच दगड मारून फोडली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत कारसमोर वाहने उभी करून रस्ता अडवल्याने अखेर कार थांबली आणि थरार संपला. नंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. दोन्ही पक्षांमध्ये समजूत काढण्यात आली. विवाह कायदेशीर असल्याचे स्पष्ट करत राजकीय मध्यस्थी आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाद मिटला. (Top 10 News)
05) भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; पंजाबमध्ये खळबळ
पंजाबच्या संगरूर येथे भाजपच्या मुख्य कार्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला केल्याने मोठी खळबळ उडालीय. हल्ल्यानंतर कार्यालयाच्या भिंतींवर काळा रंग फवारण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कार्यालयाचे नुकसान झालेय. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आलीय. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू असून तपास वेगाने सुरू आहे. एसपी-दविंदर अत्री यांनी सांगितले की, बिअरच्या बाटलीत पेट्रोल भरून पेट्रोल बॉम्ब तयार करण्यात आला होता. दोषींविरोधात एफआयआर दाखल करून लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. (Top 10 News)
6) राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्याची तयारी? भाजप संसदेत आणणार विशेष प्रस्ताव
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्यासाठी विशेष प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू असल्याचा दावा केलाय. राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यांवर आणि परदेश दौऱ्यांदरम्यान देश, सरकार व संविधानाविरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करत त्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी दुबे यांनी केलीय. तसेच 2004 ते 2026 या कालावधीतील राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची, कथित संपर्कांची आणि आर्थिक व्यवहारांची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केलीय. या दाव्यांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होतेय. (Top 10 News)
07) कियाचा मोठा प्लॅन! भारतात लवकरच Seltos, Sonet आणि Carens Hybrid कार्स लाँच होणार
भारतात हायब्रिड कार बाजारात मोठी झेप घेण्याच्या तयारीत किया मोटर्स असून, कंपनी लवकरच Seltos, Carens, Sonet आणि Sorento Hybrid मॉडेल्स सादर करण्याच्या तयारीत आहे. Sorento Hybrid ही कंपनीची भारतातील पहिली हायब्रिड कार ठरू शकते. त्यानंतर Seltos आणि Carens मध्ये 1.5-लिटर स्ट्राँग हायब्रिड इंजिन, तर पुढील पिढीच्या Sonet मध्ये 1.2-लिटर हायब्रिड पॉवरट्रेन मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या इंधनदरांमुळे आणि ग्राहकांच्या मायलेजकडे वाढलेल्या कलामुळे किया हायब्रिड तंत्रज्ञानावर भर देत आहे. कमी इंधन खर्च, आधुनिक फीचर्स आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या या कार्समुळे भारतीय ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांसोबतच हायब्रिडचा मजबूत पर्याय उपलब्ध होणार आहे. (Top 10 News)
08) iPhone 16 Plus वर 15,895 पर्यंत सूट; किंमत पाहून म्हणाल, ‘आता घेऊनच टाकतो’
नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर iPhone 16 Plus वर मोठी ऑफर उपलब्ध झालीय. फ्लिपकार्टवर या फोनच्या किंमतीत थेट ₹12,000 ची कपात करण्यात आली असून तो ₹77,900 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय फ्लिपकार्ट Axis Bank किंवा SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ₹3,895 पर्यंत अतिरिक्त सवलत मिळू शकते. त्यामुळे फोनची प्रभावी किंमत ₹74,005 इतकी होते. 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले, A18 प्रोसेसर, 48MP मुख्य कॅमेरा, IP68 रेटिंग आणि दमदार बॅटरीमुळे हा फोन प्रीमियम अनुभव देतो. तसेच 12 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI आणि जुन्या फोनवर ₹60,750 पर्यंत एक्सचेंज बोनसही मिळत असल्याने ही ऑफर अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकते. (Top 10 News)
09) मोदींचं आक्षेपार्ह पोस्टर झळकवल्याप्रकरणी अभिनेत्री अडचणीत
विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कथित आक्षेपार्ह पोस्टर हातात घेतल्याप्रकरणी बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. भाजप नेत्या केया घोष यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून इतर ठिकाणीही तक्रारी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र अद्याप कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना श्रीलेखा मित्रा यांनी पंतप्रधानांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगितले. आंदोलनात धावपळ सुरू असताना कोणीतरी पोस्टर हातात दिले आणि चष्मा नसल्यामुळे त्यावरील चित्र स्पष्ट दिसले नाही, असा दावा त्यांनी केलाय. आपण भाजपविरोधी असू शकते, मात्र देशविरोधी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेय. (Top 10 News)
10) चीनमध्ये भारतीय नेमबाजांचा ऐतिहासिक डंका; ईशा सिंगला सुवर्ण, तर मनूला कांस्य!
चीनच्या हांगझोउ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगने सुवर्णपदक पटकावले. तिने अंतिम फेरीत यजमान चीनच्या युयुए झांगला ४०-३७ अशा फरकाने पराभूत करत हा पराक्रम केला. दुसरीकडे, ऑलिम्पिक पदकविजेत्या मनू भाकरने अटीतटीच्या ‘डबल शूटऑफ’मध्ये उत्तर कोरियाच्या खेळाडूला नमवून कांस्यपदकावर नाव कोरले. या दोन पदकांसह भारताची एकूण पदक संख्या ३ झाली असून, पदक तालिकेत भारत सध्या दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (Top 10 News)




