NCP Merge into Congress : सर्वात मोठी बातमी! शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? हालचालींना वेग
NCP Merge into Congress : या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये विचारमंथन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

NCP Merge into Congress : देशातील राजकारणात भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये विचारमंथन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
या चर्चांना आणखी बळ मिळाले ते काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत बोलावल्यामुळे. त्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही दिल्लीला पाचारण करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिला होता. मात्र, काही कारणास्तव त्यावर निर्णय घेण्यास उशीर झाला. आता देशातील राजकारणात जे काही चाललं आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चालली आहे. अशावेळी सेक्युलर मतांचं विभाजन थांबवण्यासठी, देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवायला, जे काही सेक्युलर विचारांचे पक्ष आहे, त्यांनी एकत्रित यावे, अशी प्रक्रिया सुरु झाली आहे.” तसेच भाजपविरोधात व्यापक आघाडी उभारण्यासाठी विविध समविचारी पक्ष काँग्रेससोबत येण्याच्या भूमिकेत असल्याचेही पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Black Pepper: उन्हाळ्यात काळी मिरी खावी की टाळावी? जाणून घ्या फायदे आणि तोटे
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसमधून वेगळे झालेले समविचारी पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये एकत्र यावेत, असे मत व्यक्त केले होते. भाजपला प्रभावी आव्हान द्यायचे असेल तर शरद पवार यांनी पुढाकार घेऊन विरोधी मतांचे एकत्रीकरण करावे, असे त्यांनी सुचवले आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या चर्चांबाबत सावध भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसकडून असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. तर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी विलिनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय शरद पवारच घेतील, असे सांगितले.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना राजकीय रंग चढला असला, तरी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा ठोस निर्णय झालेला नाही.





