Delhi Capitals : ३ सामन्यांसाठी ६ कोटी? दिल्लीने मुस्तफिजूर रहमानसाठी उघडली तिजोरी

Mustafizur Rahman Replaces Jake Fraser McGurk in Delhi Capitals : आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांसाठी दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठा बदल झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला करारबद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेझर मॅकगर्कच्या जागी मुस्तफिजूरला संघात स्थान देण्यात आले आहे. मॅकगर्कने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जेक फ्रेझर मॅकगर्कसाठी यंदाचा हंगाम फारसा खास नव्हता. दिल्ली कॅपिटल्स संघाने मुस्तफिजूर रहमानला ६ कोटी रुपयांना संघात घेतले आहे. याआधी जेक फ्रेझर मॅकगर्कला दिल्ली कॅपिटल्सने ६ कोटी रुपयांना कायम ठेवले होते. अशा परिस्थितीत, मुस्तफिजूरला त्याच्या जागी एवढी रक्कम मिळाली आहे. याआधीही रहमान दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. त्यामुळे ही एक प्रकारे त्याची घरवापसीच आहे.
Mustafizur Rahman is back in 💙❤️ after two years!
He replaces Jake Fraser-McGurk who is unavailable for the rest of the season. pic.twitter.com/gwJ1KHyTCH
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 14, 2025
दिल्लीचे लीग स्टेजमध्यील फक्त ३ सामने शिल्लक –
आयपीएल २०२५ मध्ये, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने सलग ४ विजयासह दमदार सुरुवात केली होती. मात्र, यानंतर दिल्ली संघाने पुढील चार सामन्यात फक्त एक विजय मिळवला. ज्यामुळे दिल्ली संघाची गाडी विजयाच्या ट्रॅकवरुन घसरली. जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आली, तेव्हा दिल्लीचा संघ ११ सामन्यांतील १३ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता. संघाचा १२ वा सामना धर्मशाला येथे पंजाब किंग्जसोबत होता, जो रद्द करण्यात आला.
हेही वाचा – Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाचा ऐतिहासिक पराक्रम! आयसीसी क्रमवारीत केला नंबर १ चा विश्वविक्रम!
अशा परिस्थितीत, जर संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही, तर रहमानची प्रति सामन्याची फी सुमारे २ कोटी रुपये असेल. कारण जर पुन्हा पंजाबशी सामना झाला तर दिल्लीचे लीग टप्प्यात फक्त ३ सामने शिल्लक आहेत. मुस्तफिजूर रहमानच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचे तर आतापर्यंत त्याने या लीगमध्ये एकूण ५७ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ६१ विकेट्स आहेत. याशिवाय, मुस्तफिजूरने त्याच्या राष्ट्रीय संघ बांगलादेशसाठी १०६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर एकूण १३२ विकेट्स आहेत.





