Dehu Road News: वाढदिवसाच्या नावाखाली मध्यरात्री धुडगूस! देहूरोडच्या झोपडपट्टी परिसरातील नागरिक त्रस्त
Dehu Road News: देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी; श्रमजीवी नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांची मोठी अडचण.

Dehu Road News – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात मध्यरात्री वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली फटाक्यांची आतषबाजी करण्याचा प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. रात्री उशिरापर्यंत फटाके फोडल्याने होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. विशेषतः रात्री १२ वाजल्यानंतर ते पहाटे पाच वाजेपर्यंत अचानक फटाक्यांचा मोठा आवाज होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत पोर्टरचाळ, पारशीचाळ, श्रीकृष्णनगर, शिवाजीनगर, राजीव गांधीनगर, आंबेडकरनगर, गांधीनगर, इंदिरा गांधीनगर, शितळानगर-१ आणि शितळानगर-२ या झोपडपट्टी परिसरांचा समावेश होतो. या भागात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. त्यातील अनेक नागरिक रोजंदारी, खासगी नोकरी, छोटे व्यवसाय तसेच विविध कष्टाची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
दिवसभर कष्ट केल्यानंतर रात्रीची शांत झोप मिळणे या नागरिकांसाठी महत्त्वाचे असते. मात्र, वाढदिवस किंवा अन्य कारणांच्या निमित्ताने मध्यरात्री फटाके फोडले जात असल्याने या शांततेला बाधा येत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. राजीव गांधीनगर, आंबेडकर नगर आणि गांधीनगर परिसरात रात्री उशिरा वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत.
वाढदिवस साजरा करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, स्वतःचा आनंद साजरा करताना इतर नागरिकांच्या शांततेचा विचार करणेही आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजात फटाके फोडल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि कामगारांना त्रास सहन करावा लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.





