Indapur News: हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस उत्साहात! रक्तदान शिबिरात १६३ बाटल्या रक्ताचे संकलन; ५६३ केशर आंब्याच्या रोपांचे वाटप
Indapur News: शहाजीनगर येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावर रक्तदान शिबिर व मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणीचे आयोजन.

Indapur News – शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील ‘निरा-भीमा सहकारी साखर कारखान्या’वर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (नवी दिल्ली) अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. २१) विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात १६३ बाटल्या रक्त संकलन झाले.
भाग्यरत्न सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या या सोहळ्यात वैद्यकीय आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाइल, एक्स-रे, ई.सी.जी. व ओ.पी.डी. तपासण्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे बेंबळे (ता. माढा) येथून आलेल्या अश्विनी गणेश कदम या ऊस उत्पादक महिला शेतकर्याने उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
याशिवाय पर्यावरणपूरक संदेश देत कर्मचारी व उपस्थितांना केशर आंब्याच्या ५६३ रोपांचे वाटप करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडले.
कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे सामाजिक उपक्रम राबवण्यात आल्याचे कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले. या वेळी संचालक मंडळाच्या वतीने केक कापून हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
अभिष्टचिंतन सोहळ्यात संचालक उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे व सोहळ्याचे अध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, अनिल बोंद्रे, रामचंद्र नाईक, शिवाजी हांगे, निवृत्ती शिंदे, दत्तात्रय पोळ, चंद्रकांत भोसले, किरण पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





