Ganeshotsav 2026: जेन-झी पिढी ते पौराणिक कथा! यंदा गणेशोत्सवात ‘हे’ जिवंत देखावे ठरणार मुख्य आकर्षण
Ganeshotsav 2026: तुकाराम मुंढेंच्या कार्यशैलीपासून जेन-झी पिढीच्या जीवनशैलीपर्यंतचे विषय यंदा मंचावर; हौशी कार्यकर्त्यांना मिळणार अभिनयाची मोठी संधी.

Ganeshotsav 2026 – गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरास, विद्युत रोषणाई आणि मूर्तीच्या सजावटीसोबतच शहरातील प्रसिद्ध जिवंत देखाव्यांचीही पूर्वतयारी आता वेगाने सुरू झाली आहे. पडद्यामागील कलाकार, मंडळांचे कार्यकर्ते, नेपथ्यकार, वेशभूषाकार आणि तंत्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत असून, यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांना जिवंत रूप मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ३३७ गणेश मंडळांकडून जिवंत देखावे सादर केले जातात. यातील अनेक मंडळे विविध स्पर्धांमध्येही सहभागी होतात. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांमुळे या देखाव्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा सामाजिक विषयांमध्ये जेन-झी पिढी आणि त्यांच्या बदलत्या जीवनशैलीपासून ते अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीपर्यंतच्या विषयांना देखाव्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
रंगीत तालीम सुरू
देखावा तयार होण्यापूर्वी त्याची संपूर्ण कथा, संवाद आणि प्रसंगांची स्क्रिप्ट तयार केली जाते. स्क्रिप्ट वाचून दाखवल्यानंतर मंडळाचे पदाधिकारी, कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यात चर्चा होते. अंतिम निर्णय झाल्यानंतर कलाकारांच्या तालमी सुरू होतात. त्याचवेळी रेकॉर्डिंग, वेशभूषा, नेपथ्य, बॅकग्राउंड, स्टेज आणि प्रकाशयोजनेची तयारीही केली जाते. शहरात जिवंत देखावे तयार करण्यासाठी सुमारे १७ ते १८ संस्था आणि रेकाॅर्डिंगसाठी जवळपास २० स्टुडिओ कार्यरत आहेत.
एका देखाव्यामागे अनेक हात
सामाजिक किंवा पौराणिक देखाव्यात साधारण १० ते १२ कलाकारांचा सहभाग असतो. मात्र ऐतिहासिक देखाव्यांमध्ये पात्रांची संख्या मोठी असल्याने ३० ते ३५ कलाकारांपर्यंत सहभाग वाढतो. विशेष म्हणजे मंडळांचे हौशी कार्यकर्तेही उत्साहाने या भूमिकांमध्ये सहभागी होतात. त्यामुळे अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते.
भोसरी आणि आकुर्डी परिसरात मोठ्या प्रमाणावर जिवंत देखावे सादर केले जातात. थेरगाव, चिंचवड, काळेवाडी, आकुर्डी आणि भोसरी परिसरात या देखाव्यांना विशेष पसंती मिळते. तर वाकडमध्ये गणेश सजावटीसाठी भव्य मंदिरांच्या प्रतिकृती आणि विविध थीमवर आधारित आरास पहायला मिळते.
गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या पाच दिवसांत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत देखावे सादर केले जातात. मात्र गौराई आणि गणपती विसर्जनाच्या दिवसांनंतर गर्दी वाढू लागल्याने अनेक मंडळांकडून सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत देखावे सुरू ठेवले जातात. गाणे, नृत्य, कविता, संवाद किंवा नाट्यमय प्रसंगाने होणारी प्रत्येक देखाव्याची सुरुवात वेगळी असते.






