Dehu News: देहूकरांसाठी मोठी बातमी! नगरपंचायतीचे ‘नगर परिषदेत’ रूपांतर होणार; विशेष सभेत ठराव मंजूर
Dehu News: नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यास देहूला मिळणार भक्कम निधी अन् पायाभूत सुविधा; प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवणार.

Dehu News – तीर्थक्षेत्राचा दर्जा, वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेऊन देहू नगरपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला विशेष सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपनगराध्यक्षा प्रियंका मोरे,
माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, नगरसेविका पूनम काळोखे, सपना मोरे तसेच नगरसेवक प्रविण काळोखे, योगेश परंडवाल, योगेश काळोखे, आदित्य टिळेकर, मयूर शिवशरण, प्रिया कदम, केशव पिनाटे, धनंजय नाईकवाडे, रामदास भांगे, सुरेंद्र आंधळे आणि संधपाल गायकवाड उपस्थित होते. मुख्याधिकारी चेतन कोडे यांनी नगर परिषद दर्जासाठी आवश्यक निकष,
प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रस्तावाची माहिती सभागृहासमोर मांडली. त्यानंतर नगरपंचायत हद्दीतील सर्व नळजोडण्यांवर वॉटर मीटर बसविणे तसेच नगरपंचायत कार्यालय परिसरात आकर्षक ध्वजस्तंभ उभारण्याच्या प्रस्तावांनाही एकमताने मंजुरी देण्यात आली. २०११ च्या जनगणनेनुसार देहूची लोकसंख्या सुमारे १८ हजार होती. आगामी जनगणनेत ती २५ हजारांहून अधिक होण्याची शक्यता असून,
नगर परिषद दर्जासाठी आवश्यक निकष पूर्ण होत असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले. विशेष सभेने मंजूर केलेला ठराव पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर देहूला अधिक निधी, भक्कम पायाभूत सुविधा, सक्षम नागरी सेवा आणि विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नगरपंचायतीने व्यक्त केली.





