Bhor Farmer Loan: भोरमधील १३६ गावांना मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ६८ सोसायट्यांचे शेतकरी पात्र
Bhor Farmer Loan: 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' च्या पहिल्या टप्प्यात भोर तालुक्यातील ३,५६८ शेतकरी पात्र.

Bhor Farmer Loan – महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भोर तालुक्यात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये भोर तालुक्यातील १३६ गावांमधील ६८ संस्थेचे/ सोसायटीचे एकूण ३, ५६८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाल्याची माहिती भोर तालुक्याचे सहायक निबंधक आदिनाथ पालवे यांनी दिली.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायती तसेच तलाठी कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. महा ई-सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण, बायोमेट्रिक ईकेवायसी करणे बंधनकारक असुन शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले आधारकार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते प्रमाणीकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ थेट खात्यावर जमा होण्यासाठी यादीतील पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या ‘महा ई-सेवा केंद्र’ किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन पीडीसीसी बँकेचे अधिकारी, सोसायटी/संस्थेचे सचिव, चेअरमन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
“राज्यात सध्या सर्वत्र प्रमाणीकरण सुरू असून सर्व्हरवर मोठा लोड आला असून सर्व्हर अप डाऊन होत आहे. वरीष्ठ पातळीवर सदर समस्येबाबत कळविले असून लवकरच याबाबत वेग वाढविण्यात येईल. तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि मुदतीपूर्वी आपले आधार प्रमाणीकरण, बायोमेट्रिक केवायसी पूर्ण करून सहकार्य करावे.”
– आदिनाथ पालवे, सहायक निबंधक, भोर.





