Ambegaon Rain: मुसळधार पावसापेक्षा मानवनिर्मित संकट! आंबेगावात नैसर्गिक प्रवाह रोखल्याने महापुराचा धोका
Ambegaon Rain: ओढ्या-नाल्यांमध्ये मातीचा भराव अन् लहान पाईप टाकल्याने पाण्याची तुंबळ; सुपीक मातीसह उभी पिके वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत.

Ambegaon Rain – आंबेगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढे-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असले, तरी नैसर्गिक प्रवाह अतिक्रमणांमुळे आणि ओढे-नाले बुजविल्याने अडथळला जात आहे. परिणामी, पावसाचे पाणी थेट शेतजमिनी, घरे आणि रस्त्यांमध्ये शिरत असून शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.
त्यामुळे तालुक्यातील ओढे-नाल्यांचे तातडीने सर्वेक्षण करून अतिक्रमणे हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी ओढे-नाल्यांमध्ये माती टाकून ते बुजविण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी लहान व्यासाचे पाईप टाकून त्यांच्या नैसर्गिक रुंदीवर गदा आणण्यात आली आहे. काही गावांमध्ये ओढ्यांच्या काठावर अतिक्रमण करून बांधकामे उभारण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह आणखी संकुचित झाला आहे.
याशिवाय नाल्यांमध्ये कचरा, माती आणि झाडाझुडपांचा साठा झाल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे चित्र आहे. पूर्वी 20 ते 30 फूट रुंदीचे असलेले अनेक ओढे आज अवघ्या चार ते पाच फुटांवर आल्याने पावसाचे अतिरिक्त पाणी पर्यायी मार्गाने वाहत जाऊन शेतजमिनींमध्ये घुसत आहे. त्यामुळे सुपीक माती वाहून जात असून उभ्या पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. काही ठिकाणी ओढ्यांचा मूळ प्रवाहच बदलल्याने भविष्यात आणखी गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
महसूल विभागाने तलाठी, मंडळ अधिकारी आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील ओढे-नाल्यांचे तातडीने सर्वेक्षण करावे, अतिक्रमणे हटवून नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावा आणि पावसाळ्यात वारंवार उद्भवणारी पूरस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.





