Dehu Nagar Panchayat: देहू नगरपंचायतीत राजकीय नाट्य! प्रवीण काळोखेंच्या ‘त्या’ निर्णयाने फिरली बाजी; नक्की काय घडलं?
Dehu Nagar Panchayat: देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी योगेश काळोखे यांची बिनविरोध निवड; राजकीय नाट्यानंतर प्रवीण काळोखे रिंगणातून बाहेर.

Dehu Nagar Panchayat – देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी (दि. १०) राजकीय नाट्य पाहायला मिळाले. उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक प्रवीण काळोखे अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा असतानाच त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे योगेश काळोखे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योगेश काळोखे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
तसेच नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या दोन रिक्त जागांवर शबाना मणियार आणि दीपक खेडकर यांची निवड करण्यात आली. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली. देहू नगरपंचायतीचे उपनगराध्यक्षपद तसेच स्वीकृत नगरसेवकपदाच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
सोमवारी सकाळी १० वाजता देहू नगरपंचायतीच्या सभागृहात हवेलीचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. या पदासाठी योगेश काळोखे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्जाची छाननी करण्यात आली.
त्यानंतर माघारीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अन्य कोणताही अर्ज नसल्याने योगेश काळोखे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी एकापेक्षा अधिक इच्छुक असल्याची चर्चा निवडणुकीपूर्वी सुरू होती. त्यामुळे प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याच्या दिवशी कोण अर्ज दाखल करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
मात्र प्रत्यक्षात योगेश काळोखे यांचाच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यानंतर स्वीकृत नगरसेवकपदाच्या दोन जागांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया राबविण्यात आली. शबाना मणियार आणि दीपक खेडकर यांनी अर्ज दाखल केले. दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दोघांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर केली.
प्रवीण काळोखेंच्या भूमिकेने चर्चांना उधाण
उपनगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नगरसेवक प्रवीण काळोखे अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या उमेदवारीबाबत माघारीची अधिकृत माहिती नसल्याने सोमवारी त्यांच्या अर्जाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
प्रवीण काळोखेंनी अर्ज दाखल न करण्यामागे नेमकी कोणती राजकीय भूमिका होती, याबाबत स्पष्टता झालेली नाही. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे योगेश काळोखेंचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.






