थकबाकीदारांनो सावधान! २१ जानेवारीपासून महापालिकेचा ‘अॅक्शन प्लॅन’ सुरू; थेट जप्तीचे आदेश

जप्ती अधिपत्र पाठवूनही दुर्लक्ष करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; चालू आर्थिक वर्षासह थकीत रक्कम वसुलीसाठी प्रशासनाचे आवाहन.
PCMC Property Tax – महापालिकेचा थकीत मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेचा कर आकारणी व कर संकलन विभाग आक्रमक झाला असून मिळकतकर थकबाकीसाठी वसुलीसाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई २१ जानेवारीपासून सुरु केली आहे.
याबाबत, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व करआकारणी व करसंकलन विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी सर्व सहाय्यक मंडल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीनुसार, थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरु केली असून १८ विभागीय कार्यालयनिहाय कारवाई केली जाणार आहे.
मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी विभागनिहाय स्वतंत्र पथके तयार केली आहेत. येत्या काही दिवसांत थकबाकीदारांना जप्ती अधिपत्रे पाठवली जाणार आहेत. त्यानंतरही करभरणा न करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
यामध्ये, निवासी थकबाकीदारांचे नळजोड खंडित करणे आणि बिगरनिवासी थकबाकीदारांच्या मिळकतींवर थेट जप्ती अशी कारवाई केली जाणार आहे.नागरिकांनी चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत मिळकतकर तत्काळ भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.



