Dear Comrade Remake : अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याने तेलुगू सुपरहिट चित्रपट ‘डिअर कॉम्रेड’च्या हिंदी रीमेकमध्ये काम करणार असल्याच्या अफवांना स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिद्धांतने सांगितले की, आता तो रीमेक चित्रपटांऐवजी ओरिजिनल कंटेंटवरच लक्ष केंद्रित करणार आहे. अलीकडे अशी चर्चा होती की करण जोहरची धर्मा प्रोडक्शन्स २०१९ मधील ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटाचा हिंदी रीमेक तयार करत असून, त्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री प्रतिभा रांता मुख्य भूमिकेत असतील. मात्र, या चर्चांना सिद्धांतने पूर्णविराम दिला आहे. इंस्टाग्राम स्टोरीतून दिली स्पष्टता सिद्धांतने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हायरल झालेल्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, “मित्रांनो, हे खरे नाही. आता माझ्यासाठी कोणताही रीमेक नाही. मी ओरिजिनल चित्रपटांचा आणि कलाकारांचा चाहता आहे. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. सर्वांचे आभार.” आता ओरिजिनल प्रोजेक्ट्सवर भर सिद्धांत यापूर्वी ‘धडक २’ या रीमेक चित्रपटात काम करताना दिसला होता. मात्र, आता तो आपली सगळी ऊर्जा आणि वेळ नवीन, ओरिजिनल कथा आणि चित्रपटांसाठी देऊ इच्छित असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. प्रतिभा रांताबद्दलही व्यक्त केला आदर सिद्धांतने अभिनेत्री प्रतिभा रांता हिचे कौतुक करत सांगितले की, “प्रतिभा अतिशय टॅलेंटेड अभिनेत्री आहे. भविष्यात तिच्यासोबत एखाद्या ओरिजिनल प्रोजेक्टमध्ये काम करायला मला नक्की आवडेल.” ‘डिअर कॉम्रेड’ चित्रपटाबद्दल २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला तेलुगू चित्रपट ‘डिअर कॉम्रेड’ विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिकेमुळे लोकप्रिय झाला होता. हा चित्रपट प्रेम, राग आणि भावनिक संघर्षांवर आधारित होता. धर्मा प्रोडक्शन्सने या चित्रपटाचे हिंदी रीमेक हक्क खरेदी केले होते, मात्र विविध कारणांमुळे हा प्रोजेक्ट पुढे सरकू शकला नाही. दरम्यान, अभिनेत्री प्रतिभा रांतानेही अलीकडेच ऑफिशियल घोषणा होण्याआधी अशा अफवा पसरवू नयेत, असे सांगत नाराजी व्यक्त केली होती.