Assi Vs Do Deewane Seher Mein Day 1 Collection: ओपनिंग डे वर ‘दो दीवाने सहर में’ची आघाडी; तापसीच्या ‘अस्सी’ची मंद सुरुवात
Assi Vs Do Deewane Seher Mein Day 1 Collection ट्रेड रिपोर्टनुसार ‘अस्सी’ने पहिल्या दिवशी सुमारे 0.95 कोटी रुपयांची कमाई केली. हे आकडे प्राथमिक असून अधिकृत आकडेवारीनंतर थोडा फरक पडू शकतो. ‘अस्सी’ हा गंभीर विषयावर आधारित कोर्टरूम ड्रामा आहे.

Assi Vs Do Deewane Seher Mein Day 1 Collection: या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दोन नव्या चित्रपटांची थेट टक्कर पाहायला मिळाली. एकीकडे तापसी पन्नू हिचा कोर्टरूम ड्रामा ‘अस्सी’ प्रदर्शित झाला, तर दुसरीकडे सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकुर यांची रोमँटिक फिल्म ‘दो दीवाने सहर में’ प्रेक्षकांच्या भेटीला आली. दोन्ही चित्रपटांबद्दल वेगवेगळ्या प्रकारचा उत्साह दिसत असला तरी पहिल्या दिवसाच्या कमाईत रोमँटिक चित्रपटाने आघाडी घेतली आहे.
ट्रेड रिपोर्टनुसार ‘अस्सी’ने पहिल्या दिवशी सुमारे 0.95 कोटी रुपयांची कमाई केली. हे आकडे प्राथमिक असून अधिकृत आकडेवारीनंतर थोडा फरक पडू शकतो. ‘अस्सी’ हा गंभीर विषयावर आधारित कोर्टरूम ड्रामा आहे. या चित्रपटातून तापसीने दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत पुन्हा एकदा काम केले आहे. याआधी त्यांनी ‘मुल्क’ आणि ‘थप्पड’सारख्या चित्रपटांत एकत्र काम केले होते. त्यामुळे या चित्रपटाकडून अपेक्षा जास्त होत्या. आशयघन विषय आणि दमदार अभिनय असूनही पहिल्या दिवशी चित्रपटाला मोठी ओपनिंग मिळाली नाही.

Assi (2026) – Movie
‘अस्सी’च्या मंद सुरुवातीमागे सध्या थिएटरमध्ये सुरू असलेली मोठी स्पर्धा हे एक कारण मानले जात आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेले ‘ओ रोमियो’, ‘बॉर्डर 2’ आणि ‘मर्दानी 3’ हे चित्रपट अजूनही प्रेक्षकांना थिएटरकडे खेचत आहेत. त्यामुळे नव्या चित्रपटांना पुरेशा स्क्रीन आणि प्रेक्षकांसाठी संघर्ष करावा लागत आहे.
दुसरीकडे ‘दो दीवाने सहर में’ने ओपनिंग डेवर 1.25 कोटी रुपयांची कमाई करत आघाडी घेतली आहे. हलकी-फुलकी प्रेमकथा, फ्रेश जोडी आणि तरुण प्रेक्षकांना आवडेल असा विषय यामुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकुर यांची जोडी प्रेक्षकांना भावल्याचं चित्र दिसत आहे. समीक्षकांकडूनही चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचं सांगितलं जात आहे.
Do Deewane Shaher Mein
ओपनिंग डेच्या आकडेवारीवरून ‘दो दीवाने सहर में’ सध्या पुढे असला तरी खरी कसोटी वीकेंडची असणार आहे. शनिवार-रविवारच्या कमाईवर चित्रपटाचा पुढील प्रवास अवलंबून असतो. ‘अस्सी’चा विषय गंभीर आणि आशयप्रधान असल्यामुळे तोंडी प्रसिद्धीमुळे चित्रपटाची कमाई वाढू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकंदरीत, पहिल्या दिवशीच्या स्पर्धेत ‘दो दीवाने सहर में’ने बाजी मारली असली तरी येत्या काही दिवसांत चित्र बदलू शकते. प्रेक्षकांची पसंती आणि वीकेंडची कमाई यावर या दोन्ही चित्रपटांचे भविष्य ठरणार आहे.





