दीनानाथ रुग्णालयाचे डीन डॉ. धनंजय केळकर यांची कबुली; म्हणाले – ‘त्या दिवशी राहू-केतूचा परिणाम असावा, पण १० लाख मागितले’
पुणे – पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण प्रशासनावर रोषाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून, रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. ही माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. धनंजय केळकर यांनी पुणे येथे पत्रकारपरिषदेत जाहीर केली. विशेष म्हणजे, तनिषा भिसे यांच्या उपचारासाठी त्या दिवशी १० लाख रुपयांच्या ठेवीची (डिपॉझिट) मागणी करण्यात आल्याची कबुलीही डॉ. केळकर यांनी दिली. ते म्हणाले, “आम्ही सामान्यतः डिपॉझिट घेत नाही, पण त्या दिवशी काय झाले माहीत नाही, राहू-केतूचा परिणाम असावा, पण १० लाख मागितले गेले.”
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाच्या गंभीरतेमुळे रुग्णालय प्रशासनाने डॉ. घैसास यांचे राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे. डॉ. केळकर यांनी विश्वास व्यक्त केला की, विश्वस्त मंडळ हा राजीनामा स्वीकारेल. ते पुढे म्हणाले, “मला धमकीचे फोन येत आहेत, मी दबावाखाली आहे. सोशल मीडियावरही माझ्यावर तीव्र टीका होत आहे. या तणावपूर्ण वातावरणामुळे डॉ. घैसास यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाची बदनामी टाळण्यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.”
या घटनेमुळे रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.




