Pune: दीनानाथ रुग्णालयाबाहेर कडक बंदोबस्त

पुणे : तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाबाहेर अनेक संघटनांनी आक्रमक आंदोलने केली. या आंदोलकांना थोपविण्यासाठी तब्बल १०० ते १२५ पोलिसांची फौज सायंकाळी उशिरापर्यंत तैनात करण्यात आला होती. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उपायुक्त (परिमंडळ तीन) संभाजी कदम यांनी सांगितले, की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, तसेच सरकारचा अहवाल मिळाल्यावर काय कारवाई करायची, हे ठरवले जाईल. आम्ही आंदोलकांना सकाळपासून विनंती करत होतो, की रुग्णालयात अनेक गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. लहान मुले आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. यामुळे ही जागा आंदोलन करण्याची नाही. दरम्यान दिवसभर आंदोलनाचा अनेक संघटनांनी इशारा दिला होता. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ नये. रुग्णालयाबाहेर वाहतूक कोंडी झाल्याने नातेवाईकांनाही त्रास होत आहे, हे संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले.
या घटनेनंतर रुग्णालयाच्या परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. लोखंडी कठडे उभारून ओळखपत्र पाहून रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश देण्यात येत आहे. या भागातील रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून, वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रुग्णालयाच्या परिसरात अलंकार पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तोडफोड केल्याने भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला उपचारास विलंब केल्याचा आरोप करून डाॅ. सुश्रृत घैसास यांच्या एरंडवणे भागातील रुग्णालयाची भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांंनी आंदोलनकर्त्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डाॅ. घैसास यांच्या रुग्णालयाच्या आवारातील कुंड्या, तसेच साहित्याची आंदाेलक महिलांनी तोडफोड केली. याप्रकरणी अलंकार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी सांगितले.





