युवक काँग्रेसचा दीनानाथ रुग्णालयावर हल्लाबोल; शाई फेकून फलक फाडले, तीव्र आंदोलन

पुणे – पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपये भरण्यासाठी सांगितले. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच ते तीन लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही, तिच्यावरती उपचार सुरू केले नाहीत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या असंवेदनशील घटनेनंतर युवक काँग्रेसने रुग्णालयाचा तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन केले.
राज्य सरचिटणीस अक्षय जैन यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर काळी शाई फेकली आणि नावाचा फलक फाडून संताप व्यक्त केला. जैन म्हणाले, “शासनाकडून मोफत जमीन आणि दानातून कोट्यवधी घेऊनही रुग्णालयाची ही अवस्था आहे. सत्ताधारी आमदारही असुरक्षित असतील, तर सामान्य जनतेचे काय? माझ्या आईचाही याच रुग्णालयात कॅन्सरने मृत्यू झाला. हा धर्मादाय नव्हे, तर रुग्णांच्या मजबुरीचे शोषण आहे.”
त्यांनी धर्मादाय आयुक्तांवरही टीका केली. “तक्रारी असूनही कारवाई नाही. रुग्णालयाचे PRO नंबर जुने आहेत, ही थट्टा आहे. गांधीजींच्या विचारांसोबत भगतसिंहांची क्रांतीही आमच्यात आहे. आता अशा रुग्णालयांना जनक्षोभाला सामोरे जावे लागेल.” त्यांनी कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. या आंदोलनात सौरभ आमराळे, उमेश पवार, प्रथमेश आबनावे, भूषण राणभरे, आनंद दुबे, मेघश्याम धर्मावत, डॉ. नीरज जाधव, सद्दाम शेख, अथर्व सोनार, विशाल कामेकर, गणेश उबाळे, अविनाश साळुंखे, निशांत देशमुख, अभिजित हळदीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.





