मुख्यमंत्री कार्यालयालाही प्रतिसाद नाही! CM फडणवीसांनीच सांगितला दीनानाथचा कारभार

CM Fadanvis on Dinanath | पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका गर्भवती महिलेला पैसे नसल्याने उपचार नाकारण्यात आले आहेत. प्रसूती वेदना होत असल्याने या महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचारांसाठी आणण्यात आले होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने उपचारांपूर्वीच दहा लाख रुपये भरण्याची अट घातली. पैसे भरणे शक्य न झाल्याने अखेर महिलेला नाईलाजाने इतरत्र हलवावे लागले.
उपचारांसाठी लागलेला वेळ, झालेली दगदग यानंतर जुळ्या बाळांना जन्म देऊन या महिलेचा मृत्यू झाला. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर चौफेर टीका होत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालय प्रशासनावर होत असलेल्या मुजोर कारभाराच्या आरोपांना दुजोरा दिला आहे.
मुख्यमंत्री कार्यलयातून प्रयत्न, तरीही रुग्णालयाचा प्रतिसाद नाही – फडणवीसांची माहिती
पुण्यात घडलेल्या या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री कक्ष देखील या प्रकरणाकडे लक्ष देत होता, परंतु दुर्दैवाने रुग्णालयाकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, मृत महिलेचा पती आमदार गोरखे यांचा स्वीयसहाय्यक आहे. रुग्णालयाने १० लाख जमा करण्याची अट घातल्यानंतर मंत्रालयातून याबाबत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरी देखील रुग्णालय प्रशासन १० लाख रुपये भरण्याच्या अटीवर ठाम राहिल्याचा आरोप करण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे आता या आरोपाला एकप्रकारे दुजोराच मिळाला आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री… | CM Fadanvis on Dinanath
“पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतून आपल्याला पाहायला मिळतो आहे. खरं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हे अत्यंत प्रतिष्ठित रुग्णालय आहे, आणि लता दीदींनी त्याठिकाणी पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबीयांनी त्याच्या पाठीमागे सर्व आपले संसाधने उभी करून हे रुग्णालय उभं केलं. पण ज्या प्रकारे तिथल्या काही डॉक्टरांनी किंवा कर्मचाऱ्यांनी अत्यंत असंवेदनशीलतेने प्रसूतीला आलेल्या महिलेला तिथे दाखल करण्यास नकार दिला किंवा अधिक पैसे मागितले, अशा प्रकारचा विषय याठिकाणी आलेला आहे. लोकांमध्ये या प्रकरणाबद्दल अतिशय चीड आहे, विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा आहे.”
उच्चस्तरीय समितीची स्थापना
“मी एक उच्चस्तरीय समिती तयार केली आहे जी या घटनेचा तपास करेल आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कसा नियंत्रण ठेवता येईल, यावर चर्चा करेल. विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे, कारण अशा प्रकरणांमध्ये पैशाची चिंता न करता रुग्णाला दाखल करून घेणं हे गरजेचं होतं. त्यामुळे, पालन होतंय की नाही याबद्दल देखील आम्ही प्रयत्नशील असू.” असे देखील त्यांनी सांगितले.
दुर्दैवाने रुग्णालयाकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही | CM Fadanvis on Dinanath
“आमचा मुख्यमंत्री कक्ष देखील या प्रकरणाकडे लक्ष देत होता, परंतु दुर्दैवाने रुग्णालयाकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नयेत म्हणून कडक कारवाई करण्याचा आमचा मानस आहे. उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही रुग्णालय याप्रकारे वागत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो निधी निर्धन रुग्णांच्या खात्यावर जमा होतो, त्याची पारदर्शकता रुग्णालयात अद्याप नाही.”
“आपण याच अधिवेशनामध्ये या संदर्भात कायदा पारित केला आहे. कारण अनेक रुग्णालयांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिरिक्त फायदा घेतला आणि त्यांना तो आदेश लागू झाला नाही. त्यामुळे आम्ही त्या संदर्भात एक योजना तयार केली आहे. या अधिवेशनात कायद्याने आता धर्मदाय संस्थेकडे त्याचे अधिकार घेतले आहेत. धर्मदायी संस्था स्वतंत्रपणे चालतात, पण त्यामध्ये काही ना काही नियंत्रण राज्य विभागाचे असते. त्यामुळे, त्या कायदा आणि न्याय विभागाच्या माध्यमातून या सर्व रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
“मधल्या काळात आम्ही धर्मदाय रुग्णालयांसाठी एक मंच तयार केला आहे, ज्यावर ते किती पैसे खर्च करतात, किती केले आहेत, याबाबत पारदर्शक माहिती दिली जाईल. आणि त्या संदर्भात, त्यांची जबाबदारी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”





