‘दीनानाथ हॉस्पिटल’च्या हटवादीपणामुळे गर्भवतीचा जीव गेला! पुण्यात संतापाची लाट

पुणे – पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या हटवादीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीच्या कळा सुरू झालेल्या तनिषा सुशांत भिसे या महिलेला दाखल करण्यासाठी आणलं असता, रुग्णालयाने 10 लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबीय अडीच लाख रुपये देण्यास तयार असतानाही प्रशासनाने दाखल करून घेण्यास नकार दिला. दुसऱ्या रुग्णालयात हलवताना तनिषाला त्रास वाढला आणि जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला, असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली असून, “नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे महाराष्ट्रात आधुनिक उपकरणे, प्रगत तंत्रज्ञान आणि निष्णात डॉक्टरांसाठी प्रसिद्ध आहे. पण या घटनेने रुग्णालयाच्या प्रतिष्ठेला तडा गेला आहे. तनिषाला प्रसूतीसाठी आणलं तेव्हा प्रशासनाने 10 लाखांची मागणी केली. इतकी रक्कम अचानक कुठून आणायची, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला. अडीच लाख देण्याची तयारी असतानाही रुग्णालयाने नकार दिला. शेवटी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला, पण वाटेतच तनिषाची प्रकृती खालावली. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला, पण स्वतःचा जीव वाचवू शकली नाही.
तनिषाचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयाने दाखल न केल्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला, तरीही प्रशासन ऐकायला तयार झालं नाही. या घटनेनंतर आमदार गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नोंदवली आहे. पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, रुग्णालयाच्या या बेजबाबदारपणावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आमदार अमित गोरखे, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली असून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या या हटवादीपणा आणि हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला आहे.
रुग्णालयाची प्रतिक्रिया –





