दीनानाथ हॉस्पिटलच्या हलगर्जीमुळे महिलेचा मृत्यू? तनिषा भिसे प्रकरणात महिला आयोगाचा हस्तक्षेप

पुणे – पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. प्रसूतीच्या कळा सुरू झालेल्या तनिषा सुशांत भिसे या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणलं असता, प्रशासनाने उपचारापूर्वी 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अडीच लाख रुपये देण्याची तयारी असतानाही रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. दुसऱ्या रुग्णालयात हलवताना तनिषाची प्रकृती खालावली आणि जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेने रुग्णालयाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
काय आहे प्रकरण?
तनिषा भिसे यांना 29 मार्च रोजी प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आलं होतं. कुटुंबीयांचा दावा आहे की, रुग्णालयाने 10 लाख रुपये जमा करण्याची अट घातली आणि अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवूनही तिला दाखल करून घेतलं नाही. परिणामी, तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं, पण वाटेतच तिची तब्येत बिघडली. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला, पण स्वतःचा जीव वाचवू शकली नाही. तनिषाचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रुग्णालयाला संपर्क साधला, तरीही प्रशासनाने ऐकलं नाही. या घटनेनंतर आमदार गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नोंदवली आहे.
अमित गोरेखे यांचा आरोप काय?
दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला ती आमदार गोरखे यांचे पीए संतोष भिसे यांची पत्नी होती. तनिषा सुशांत भिसे असं या मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेचं नाव आहे. तनिषा यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी दिनानाथ रुग्णालयानं 10 लाखांची मागणी केली होती. कुटुंब अडीच लाख भरण्यासाठी तयार असताना देखील या महिलेला ॲडमिट करण्यात आलं नाही. रुग्णाची अवस्था सिरिअस असताना देखील रुग्णालयानं त्यांना ॲडमिट केलं नाही, असा आरोप गोरखे यांनी केला आहे. आपन या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत उचलणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणा,योग्य उपचार न दिल्याने २ जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे.या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.आयोगाने आयुक्त,पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य… pic.twitter.com/AA05eaAUAh
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 3, 2025
महिला आयोगाची दखल
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने पावलं उचलली आहेत. चाकणकर म्हणाल्या, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे एका मातेचा जीव गेला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही याची चौकशी करणार आहोत.” आयोगाने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना तथ्य तपासून कार्यवाही करण्याचे आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. “महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
रुग्णालयाची प्रतिक्रिया
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी सांगितलं, “या घटनेची चौकशी केली जाणार आहे. आम्ही राज्य सरकारला अहवाल सादर करू. मीडियात येणाऱ्या बातम्या अर्धवट आहेत. आरोपांची तपासणी होईल, पण सध्या जास्त बोलता येणार नाही.” रुग्णालयाने आरोप फेटाळले असले तरी या प्रकरणाने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.
जनतेचा संताप
या घटनेनंतर पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा का?” असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. तनिषाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. हे प्रकरण आता चौकशीच्या कक्षेत असून, महिला आयोगाच्या हस्तक्षेपामुळे यातून काय निष्कर्ष निघतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





