DC vs SRH : दिल्लीने सलग दुसऱ्या सामन्यात तख्त राखलं! तगड्या हैदराबादवर मिळवला विजय, स्टार्क ठरला गेमचेंजर

DC vs SRH Delhi Capitals beat Sunrisers Hyderabad by 7 wickets : गोलंदाजांनंतर फलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर, दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सने पराभव केला. या विजयासह दिल्लीने आयपीएल २०२५ मधील आपला सलग दुसरा विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर या हंगामाची दमदार सुरुवात करणाऱ्या हैदराबादचा सलग दुसरा पराभव ठरला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने अनिकेत वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १६३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १६ षटकांत तीन गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. दिल्लीसाठी मिचेल स्टार्कने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
दिल्लीने सलग दुसऱ्या सामन्यात तख्त राखलं –
लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्लीने चांगली सुरुवात केली, डु प्लेसिस आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क यांनी पहिल्या विकेट्ससाठी ८१ धावांची भागीदारी केली. या काळात डू प्लेसिसने अर्धशतक झळकावले. हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या झीशान अन्सारीने शानदार कामगिरी केली आणि तीन विकेट्स घेतल्या, परंतु लक्ष्य इतके छोटे होते की दिल्लीला ते साध्य करण्यात कोणतीही अडचण आली नाही. झीशानने प्रथम डू प्लेसिसला बाद केले आणि नंतर मॅकगर्कला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर त्याने दिल्लीकडून पहिला सामना खेळणाऱ्या केएल राहुलला बाद केले. तथापि, झीशानच्या प्रयत्नांचा संघाला काही फायदा झाला नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
A Delightful Win 🎊@DelhiCapitals continue their winning run in #TATAIPL 2025 with an all round performance against #SRH 🙌
Scorecard ▶️ https://t.co/L4vEDKzthJ#DCvSRH pic.twitter.com/4rpc60cT9j
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
फाफ डू प्लेसिसने केल्या सर्वाधिक ५० धावा –
दिल्ली कॅपिटल्सकडून डू प्लेसिसने सर्वाधिक ५० धावा केल्या, तर मॅकगर्कने ३८ धावांचे योगदान दिले. पाच चेंडूत १५ धावा काढून केएल राहुल पॅव्हेलियनमध्ये परतला. तीन विकेट्स पडल्यानंतर, अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी जबाबदारी स्वीकारली आणि आक्रमक फलंदाजी केली. १६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेकने षटकार मारून दिल्लीला विजय मिळवून दिला. पोरेलने पाच चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह १५ धावा काढल्या, तर स्टब्सने १४ चेंडूत तीन चौकारांसह २१ धावा काढल्या. सनरायझर्सकडून झिशानने तिन्ही विकेट घेतल्या तर इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट्स मिळाली नाही.
हेही वाचा – DC vs SRH : बुलेट शॉटवर जॅक फ्रेझर मॅकगर्कने घेतला अफलातून कॅच, फलंदाजही झाला चकित, पाहा VIDEO
स्टार्कची गोलंदाजी अनिकेतच्या फलंदाजीवर ठरली भारी –
तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांची फलंदाजी चांगली झाली नाही. ज्यामुळे संपूर्ण संघ १८.४ षटकांत १६३ धावांवर गारद झाला. सनरायझर्स हैदराबादसाठी अनिकेत वर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४१ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७४ धावांची दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर दिल्लीकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने शानदार कामगिरी करत पाच विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने तीन आणि मोहित शर्माने एक विकेट्स घेतली.





