Pune District : हवेलीतील ‘त्या’ 12 गावांना पुन्हा दिवसा वीजपुरवठा
या पार्श्वभूमीवर सभापती युवराज काकडे यांनी आमदार माऊली कटके तसेच महावितरणकडे निवेदन देऊन दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती.

सोरतापवाडी : पूर्व हवेलीतील शेतकर्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून थेऊर, नायगाव व हिंगणगाव (एजी) फिडरअंतर्गत येणार्या 12 गावांमध्ये पुन्हा दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासाठी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी केलेला पाठपुरावा तसेच दैनिक प्रभातने सातत्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांना अखेर यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पूर्व हवेली परिसरात अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. एकीकडे पावसाने दडी मारली असताना दुसरीकडे लोडशेडिंगमुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर सभापती युवराज काकडे यांनी आमदार माऊली कटके तसेच महावितरणकडे निवेदन देऊन दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती.
दैनिक प्रभातनेही 30 मे रोजी लोडशेडिंगच्या झटक्याने शेती संकटात या आशयाची बातमी प्रसिद्ध करून महावितरणचे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक दखल घेत थेऊर, कोलवडी-साष्टे, नायगाव, पेठगाव, कोरेगाव मूळ, भवरापूर, अष्टापूर, खामगाव टेक, टिळेकरवाडी, शिरसवडी, बिवरी आणि नायगाव या 12 गावांमध्ये दिवसा वीजपुरवठा सुरू केला आहे. यापूर्वी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होत असल्याने शेतकर्यांना शेतात जाऊन मोटारी सुरू कराव्या लागत होत्या. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. तसेच वारंवार होणार्या वीजखंडितामुळे शेतीपिकांनाही फटका बसत होता.
पेठ येथील प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय चौधरी यांनी दिवसा किमान चार ते पाच तास सलग वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी प्रभातच्या माध्यमातून केली होती. तर आदर्श सरपंच सूरज चौधरी यांनी समस्येवर तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता.
महावितरणने दिवसा वीजपुरवठा सुरू केल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून शेतीची कामे सुरळीत होण्यास मदत होणार आहे. शेतकर्यांच्या मागण्यांची दखल घेऊन दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पुढेही शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू राहील.
-युवराज काकडे, सभापती, हवेली पंचायत समिती
हेही वाचा : Khalapur : जीवन प्राधिकरणाच्या अपूर्ण कामामुळे शेतकरी अडचणीत





